लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरांत पावसाळापूर्व कामे वेगात सुरू असली तरी लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला अधिक वेग द्या. तसेच, त्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना राबवा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिले.

महानगरपालिकेच्या परिमंडळ सहामधील घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड (एन, एस आणि टी विभाग) परिसरातील सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांची तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींची आणि दरडप्रवण क्षेत्राची डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. तसेच, एन विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सैनी यांनी एन, एस आणि टी विभागात प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

आणखी वाचा-कोकण रेल्वेवर ब्लॉक : रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

एन विभागातील मलनिःसारण, पर्जन्य जलवाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी लावलेल्या प्रतिबंधक जाळ्या तसेच झाकणांची त्यांनी यावेळी पाहणी केली. पर्जन्य जलवाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी प्रतिबंधक जाळ्या व झाकणे व्यवस्थित बसविलेल्या आहेत का, याचीही खात्री करून घेतली. अनेक ठिकाणी त्यांनी मॅनहोलच्या जाळ्या उचलून तपासल्या. तसेच आवश्यक त्या सर्व ठिकाणी मनुष्य प्रवेशिकांवर जाळी आणि झाकणे बसविण्याची कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, सैनी यांनी एन विभागातील विक्रोळी परिसरातील राम नगर येथील मोडकळीस आलेल्या इमारतींची व दरडप्रवण क्षेत्राचीही पाहणी केली. येथील रहिवाशांमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत जनजागृती करा, असेही निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले.

आणखी वाचा-मुंबई : मिठागराच्या जागेवर बांधकामाच्या कचऱ्याचे ढीग

यावेळी उप आयुक्त रमाकांत बिरादार, एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, टी विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे आदींसह पर्जन्य जलवाहिन्या, घन कचरा व्यवस्थापन विभाग, मलनि:सारण प्रचालन, म्हाडा, मेट्रो, एमआरआयडीसी, वन विभाग, रेल्वे प्राधिकरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.