लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या संकेतस्थळामध्ये गुरुवारी सकाळपासून तांत्रिक बिघाड झाल्याने संकेतस्थळ बंद झाले. त्यामुळे लाखो प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढणे अशक्य झाले होते. याबाबत अनेक प्रवाशांनी समाज माध्यमांतून संताप व्यक्त केला होता.

नववर्षानिमित्त बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची रेल्वे तिकीट काढण्यासाठी गडबड सुरू होती. तसेच नाताळ साजरा करून अनेक प्रवासी विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट काढत होते. परंतु, गुरुवारी सकाळपासून झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लाखो प्रवाशांना तिकीट काढता येणे कठीण झाले. या गोंधळामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. ‘संकेतस्थळाच्या देखभाल-दुरूस्तीमुळे ई-तिकिटिंग सेवा उपलब्ध होणार नाही. कृपया नंतर प्रयत्न करा.’ असा संदेश प्रवाशांना संकेतस्थळावर दाखवण्यात येत होता. त्यामुळे प्रवाशांनी वारंवार आयआरसीटीसीचे संकेतस्थळ चालू-बंद करून देखील संकेतस्थळ सुरू होत नव्हते.

आणखी वाचा-मुंबईत पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने पकडले

अखेरीस सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास संकेतस्थळ पूर्वस्थितीत आले. परंतु, अनेक प्रवाशांचे तिकीटाचे पैसे भरण्याची प्रक्रिया अर्धवट राहिली होती. तसेच तिकीट आरक्षणाचा तपशील दिसत नव्हता. यासह अनेकांना नियमितसह विशेष रेल्वेगाडीचे तिकीट आरक्षण करता न आल्याने, आरक्षित तिकीट मिळाले नाही. या सर्व गडबडीमुळे अनेकांनी जवळचे रेल्वे स्थानक गाठून तिकीट काढले. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे सकाळी १०.०१ ते सकाळी १०.४० आणि सकाळी १०.५१ ते सकाळी ११.२३ वाजेपर्यंत संकेतस्थळ बंद होते. या कालावधीत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) सुविधा सुरू होती, अशी माहिती आयआरसीटीसी द्वारे देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc website was down from thursday morning make trouble for traveller mumbai print news mrj