मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकाबाहेरील विकास प्रकल्पांना आणि वर्सोवा-विरार सागरी सेतूला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका)कडून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार असून भारतात एकावरच न थांबता आणखी बुलेट ट्रेन सुरु व्हाव्यात, अशी अपेक्षा फडणवीस यांनी जपानमधील टोकिओ येथे बोलताना व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस यांनी बुधवारी जपानचे पायाभूत सुविधा आणि वाहतूक उपमंत्री निशिदा शोजी यांची भेट घेतली. बुलेट ट्रेन स्थानकाबाहेर होणाऱ्या विकास प्रकल्पांना जायकाच्या माध्यमातून वित्तसहाय्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मुंबई पारबंदर प्रकल्प (ट्रान्सहार्बर लिंक) लवकरच पूर्णत्वास जात असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

फडणवीस यांची इस्ट जपान रेल्वे कंपनी, जेआर इस्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यूजी फुकासावा यांच्यासमवेत बैठक झाली. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी इकुजू असामी आणि तकेशी त्सुयोशी हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात बुलेट ट्रेनची पायाभरणी केली आणि भारत-जपान मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला गेला. अतिशय गतीने हे काम सुरू असून कालमर्यादा पाळल्या जात आहेत. या प्रकल्पात २०२० नंतर आलेल्या अडचणी सोडविल्या गेल्या आहेत आणि गतीने काम केले जात आहे. फडणवीस यांनी जपानमधील शिनकानसेन बुलेट ट्रेनच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची प्रवासी क्षमता बोईंग विमानाच्या तिप्पट असेल. जेट्रोचे अध्यक्ष नोरिहिको इशिगुरो यांचीही फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कार्यकारी उपाध्यक्ष काझुया नाकाजो आणि संचालक मुनेनोरी मात्सुंगा हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी भारतातील स्टार्टअपला मदत करण्याची तयारी दर्शविली. निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचे संचालक मिनोरू किमुरा, महाव्यवस्थापक हिरोकी यामाऊचि, संदीप सिक्का यांच्याशीही फडणवीस यांनी चर्चा केली. निप्पॉन लाईफ इन्शुरन्स ही भारतातील सर्वात मोठी वित्तीय व्यवस्थापन आणि विमा सेवा देणारी कंपनी आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, एमएमआरडीएकडून दोन तीन प्रकल्पांसाठी निप्पॉन लाईफ इन्शुरन्सकडून घेण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याला राज्य सरकार हमी देईल. फडणवीस यांनी टोकियोतील दूतावासात भारतीयांशी संवाद साधला. जपानमध्ये सुमारे १५०० भारतीय व्यावसायिक आहेत. भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण फडणवीस यांनी जपानमधील भारतीयांसमवेत आनंदाने साजरा केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan assistance to major projects in the state assertion by devendra fadnavis ysh