मुंबई : घरकामगार महिलेने बदली कामासाठी पाठविल्याचे खोटे सांगून घरात शिरलेल्या महिलेने वयोवृद्धाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात घडला होता. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी महिलेस विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. शीतल अरुण उपाध्याय असे या महिलेचे नाव असून आरोपी महिला शीतल हिने कामाचा बहाणा करुन कपाटातील सोन्याचे दागिने आणि चार हजार रुपयांची रोख असा ३ लाख ६८ हजाराचा ऐवज चोरी केला होता. वयोवृद्ध महिलेच्या घरात शिरून चोरी झाल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तात्काळ तपासाला सुरूवात केली होती. आरोपी महिलेकडून चोरलेली मालमत्ता हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सविता श्रीपाल जैन (७८) या विलेपार्ले येथील आझाद रोड, राजतारा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा विवाहीत मुलगा गोरेगाव येथे त्याच्या कुटुंबियासह राहात असून त्याचे विद्युत वस्तूचे दुकान आहे. त्या मुलांसह २१ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता मरिनलाईन्स येथे कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती श्रीपाल जैन हे घरी होते. सायंकाळी साडेपाच वाजता ते सर्वजण घरी आले. त्यांना घराचे दार उघडे दिसले तर तिचे पती घरात आराम करत होते. लोखंडी कपाटही उघडे होते. त्यांनी आतील सामानाची पाहणी केली असता कपाटातून चार हजार रुपये रोख आणि ३ लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी पतीकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी एक महिला घरी आली होती. त्यांच्याकडील घरकामगार कामावर येणार नसल्याने तिने महिलेला कामासाठी घरी पाठविले होते. काम करुन ती निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्याच महिलेने कामाचा बहाणा करुन त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रकम चोरून पलायन केले होते.

हे ही वाचा…“सरकार आमचं ऐकत नाही, हे म्हणण्याची वेळ आली आहे”, नरहरी झिरवाळांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर!

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांकडे धाव घेतली व याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा दाखल केला आहे. वृद्धांच्या घरात झालेल्या चोरीमुळे पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपासाला सुरूवात केली. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शीतल उपाध्याय या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेकडून चोरलेल्या मुद्देमालाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vile parle woman entered in house and stole after falsely claiming sent by domestic worker mumbai print news sud 02