लोकसत्ता टीम

यवतमाळ : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) मार्फत उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल व्हावा या उद्देशाने गुणवत्ताप्राप्त महाविद्यालयांना पाच कोटी रूपयांचे अनुदान दिले जाते. यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयास हे अनुदान मंजूर झाले. मात्र या महाविद्यालयाचे गुणांकन कमी असुनही अनुदान देण्यात आल्याची बाब उजेडात आल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानंतर ‘रूसा’ने महाविद्यालयाची चौकशी सुरू केली आहे.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल व्हावा यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत पाच कोटी रूपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी युजीसीच्या राष्ट्रीय मुल्यांकन समिती (नॅक)ने दिलेले गुणांकन विचारात घेतले जाते. सोबतच ‘रूसा’कडूनही मूल्यांकन होवून गुणांकन केले जाते. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास चार महाविद्यालयांना राष्ट्रीय मुल्यांकन समितीने केलेल्या मुल्यांकनात ‘अे’ श्रेणी मिळाली आहे. या सर्व महाविद्यालयात ‘रूसा’नेही मूल्यांकन केले.

आणखी वाचा-यवतमाळ : “सोयाबीनले भाव नाही, त भाजपाले मत नाही!” शेतकऱ्यांचा पोळ्यात संताप…

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय सध्या व्यवस्थापन, प्राध्यापकांचा संघर्ष, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आदी कारणांमुळे चर्चेत आहे. या महाविद्यालयातील व्यवस्थापनाच्या वादामुळे राष्ट्रीय मूल्यांकन समितीच्या प्रथम मुल्यांकनानंतर तब्बल १८ वर्षानंतर ‘नॅक’ मूल्यांकन झाले. त्यासाठीसुद्धा महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही गुणवत्ताप्राप्त महाविद्यालयांना डावलून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयास ‘रूसा’च्या पाच कोटी रूपयांच्या अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्याने शैक्षणिक वुर्तळात आश्चर्य व्यक्त होत आहे. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय हे संघ परिवाराच्या वर्तुळातील असल्याने शासन मेहरबान असावे, अशी टीका शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.

त्रि-सदस्यीय चौकशी समिती

यवतमाळच्या बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयासह ठाणे, गडचिरोली, अहमदनगर, नांदेड, लातूर, चंद्रपूर, धुळे, परभणी, सांगली व अमरावती अशा ११ जिल्ह्यातील महाविद्यालयांना कमी गुणांकन असुनही ‘रूसा’चे पाच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर झाले. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर, कमी गुणांकन असलेल्या संस्थांना मान्यता कशी देण्यात आली, याची चौकशी करावी व तोपर्यंत या संस्थांना निधी वितरित करू नये, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दिले. त्यामुळे ‘रूसा’ प्रकल्प संचालकांनी या संदर्भात चौकशी करण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी त्रि-सदस्यीय समिती नेमली. यवतमाळच्या बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना या संदर्भात म्हणणे मांडण्यासाठी बुधवार, ४ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बोलावण्यात आले आहे.

आणखी वाचा-शिक्षण विभागातील बदल्यांसाठी ‘रेट कार्ड’, शिक्षण मंत्री म्हणाले बदल्याच बंद तर…

‘रूसा’नेच गुणांकन केले

‘रूसा’नेचे महाविद्यालयाचे मूल्यांकन करून गुणांकन केले. आता त्यांनीच कमी गुणांकन असल्याचे सांगून म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. आमचा सर्व प्रस्ताव सुस्पष्ट होता. आता म्हणणे मांडल्यानंतर काय निर्णय होते बघुया, अशी प्रतिक्रिया बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रदीप दरवरे यांनी दिली.