चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती व आर्थिक घोटाळ्यांच्या तक्रारी तथा गोळीबार प्रकरणामुळे राजकीय वैमनस्य असलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत व काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर रविवारी प्रथमच एका मंचावर आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तथा जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने धानोरकर-रावत यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

संतोष रावत व आमदार धानोरकर यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. दिवं. बाळू धानोरकर यांनी जिल्हा बँकेतील नोकर भरती प्रकरणापासून तर अनेक आर्थिक विषयांच्या तक्रारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत केल्या होत्या. या तक्रारींमुळेच जिल्हा बँकेतील नोकर भरतीला स्थगिती मिळाली. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत या तक्रारींचा सपाटा सुरू होता. याच काळात रावत यांच्यावर मूल येथे गोळीबार झाला. या गोळीबार प्रकरणात काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्याला अटक झाली. त्यामुळे यामागे कोण आहेत, हे सर्वश्रृत आहे.

हेही वाचा – बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुका जाहीर होताच आमदार धानोरकर यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. रविवारी मूल येथे काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होते. मूलमध्ये रावत यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे रावत यांना सोबत घेणे आवश्यक आहे, हे धानोरकर यांना उमगले. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या माध्यमातून रावत यांच्याशी संपर्क करण्यात आला. धोटे यांच्या आग्रहास्तव रावत काँग्रेस कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. यावेळी रावत यांनी मनातील खदखद व्यक्त करीत गोळीबारासारख्या आघातातून बचावल्याचे सांगितले.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

हेही वाचा – रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश

आमदार धानोरकर यांनी लहान बहीण समजून निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन केले. यानंतर धोटे यांच्या मध्यस्थीने धानोरकर व रावत यांच्यात काँग्रेस कार्यालयातच बंदद्वार चर्चा झाली. ही चर्चा पूर्णपणे राजकीय होती, मात्र सविस्तर तपशील समजू शकला नाही. मात्र, रावत काँग्रेस मंचावर आल्याने धानोरकर यांना बळ मिळाले आहे.