लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : डबल इंजिनच्या सरकारची ताकद काय असते, हे सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्रात तर डबल बुस्टरची साथ मिळाली आहे, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत ‘पायलट’ बदलले तरी विकासाचा वेग मात्र कायम राहणार आहे, असा दावा बुधवारी येथे केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आपण ‘पायलट’ असताना राज्यात अनेक महत्वाच्या प्रकल्प, योजनांचे ‘टेकऑफ’ होऊ शकले, आता ‘पायलट’ची जागा बदलली आहे, पण विकासाचे विमान अधिक वेगाने धावताना पाहत आहोत, असा उल्लेख केला होता, त्याचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायलट इकडे किंवा तिकडे असो, विकासाचे इंजिन तेच आहे आणि महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाणार आहे. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावती विमानतळाचा पूर्णपणे उपयोग करायचा असेल, तर धावपट्टी ही ३ हजार मीटरपर्यंत वाढवावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. तेही काम लवकरच सुरू केले जाणार आहे. विदर्भातील अकोला, यवतमाळ, गडचिरोली येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचेही काम हाती घेण्यात येणार आहे. विमाने ही केवळ श्रीमंतांच्या प्रवासाची साधने नाहीत, तर औद्योगिक विकासासाठी महत्वाची आहेत. ज्या ठिकाणी विमानतळ आहे, त्या शहरात उद्योजक पसंती देत असतात.

अमरावतीत एअर इंडिया कंपनीची दक्षिण आशियातील सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था उभारली जात आहे. या ठिकाणी दरवर्षी १८० वैमानिक तयार होतील. त्यामुळे अमरावतीचे नाव हे जागतिक हवाई नकाशावर पोहचणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत पीएम-मित्रा मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर केला. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. अमरावतीत माहिती तंत्रज्ञान संकुल (आयटी पार्क) उभारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ हा जगाशी जोडला जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadanvis talk about mahayuti government and ajit pawar and eknath shinde mma 73 mrj