लोकसत्ता टीम
नागपूरः उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियावर नियंत्रण मिळत नसल्याने नागरिक बेजार झाले आहे. प्रथम धरमपेठ आणि मंगळवारी झोनमध्येच आढळणाऱ्या चिकनगुनियाचा आता शहरातील जवळपास सगळ्याच प्रभागात प्रसार झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून पुढे येत आहे. दरम्यान महापालिकेकडून सर्वत्र सर्व्हेक्षण, किटकनाशक फवारणीसह इतर उपाय सुरू केले गेले आहे.
नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार नागपुरात १ जानेवारी २०२४ ते ६ ऑगस्ट २०२४ दरम्यानच्या कालावधीत चिकनगुनियाचे एकूण १५२ रुग्ण आढळले. तर डेंग्यूच्या ६३ रुग्णांची नोंद झाली. चिकनगुनियाचे सर्वाधिक ७९ रुग्ण मंगळवारी झोनमध्ये तर ६२ रुग्ण धरमपेठ झोनमध्ये नोंदवले गेले. तर लक्ष्मीनगर झोनमध्ये २, हनुमाननगर झोनला २, धंतोली झोनला १, नेहरूनगर झोनला २, सतरंजीपुरा झोनला १, आशिनगर झोनला १ रुग्णाची नोंद झाली.
आणखी वाचा-पैशांसाठी देहव्यापार : ‘त्या’ दाम्पत्याने गरजू विद्यार्थिनी, विवाहित महिलेला हेरले अन्…
लकडगंज झोनला एकाही रुग्णाची नोंद नसली तरी येथेही चिकनगुनियाची लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांवर शासकीय व खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरू असल्याचे स्थानिक नागरिकाचे म्हणणे आहे. तर डेंग्यूचे सर्वाधिक ११ रुग्ण लक्ष्मीनगर झोनला नोंदवले गेले आहे. तर आशिनगर झोनला १०, लकडगंज झोनला ८, धरमपेठ झोनला ७, हनुमाननगर झोनला ६, धंतोली झोनला ६, नेहरूनगर झोनला ४, गांधीबाग झोनला २, सतरंजीपुरा झोनला ३, मंगळवारी झोनला ६ रुग्ण नोंदवले गेले. या आकडेवारीला नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे. सोबत शहरात घरोघरी तापाचे सर्व्हेक्षण, किटकनाशक फवारणी, उपचारासह औषधांची उपलब्धता, जनजागृती केली जात असून आजार नियंत्रणात असल्याचा दावा होत आहे.
आणखी वाचा-हुल्लडबाजांना चाप… नागपूरच्या रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दीड हजार वाहनचालकांचे…
डेंग्यू व चिकनगुनियाची झोननिहाय स्थिती (१ जानेवारी ते ६ ऑगस्ट २०२४)
झोन | डेंग्यू | चिकुनगुनिया |
लक्ष्मीनगर | ११ | ०२ |
धरमपेठ | ०७ | ६२ |
हनुमाननगर | ०६ | ०२ |
धंतोली | ०६ | ०१ |
नेहरूनगर | ०४ | ०२ |
गांधीबाग | ०२ | ०२ |
सतरंजीपुरा | ०३ | ०१ |
लकडगंज | ०८ | ०० |
आशिनगर | १० | ०१ |
मंगळवारी | ०६ | ७९ |
एकूण | ६३ | १५२ |
चिकनगुनिया म्हणजे काय ?
चिकनगुनिया ज्याला चिकनगुनिया विषाणू रोग किंवा चिकनगुनिया ताप देखील म्हणतात, हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग डेंग्यू तापासारखा दिसतो, आणि तो तीव्र, कधी कधी सतत, सांधेदुखी (संधिवात), तसेच ताप आणि पुरळ यांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. हे क्वचितच जीवघेणे असते.
डेंग्यू म्हणजे काय?
डेंग्यू हा विषाणूमुळे होतो जो मुख्यतः एडिस इजिप्ती प्रजातीच्या मादी डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यूची लक्षणे काही नाही ते फ्लूसारखी गंभीर लक्षणे असतात. थोड्या प्रमाणात लोकांमध्ये गंभीर डेंग्यू होतो, जो प्राणघातक ठरू शकतो. डेंग्यूचे चार जवळचे विषाणू आहेत, ज्यांना डेंग्यू सेरोटाइप म्हणतात.
© The Indian Express (P) Ltd