थरार... रात्रीची वेळ, किर्र अंधार... अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ...|jitendra tijare and prithviraj rathore along with their staff on a night patroling suddenly a tiger came front of them in bhandara | Loksatta

थरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…

जंगलव्याप्त परिसरात असलेल्या शेतांमध्ये सध्या धान कापणी व बांधणीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत वाघ दिसत असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

थरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

भंडारा : रात्रीची वेळ, किर्र अंधार. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे व पृथ्वीराज राठोड कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीवर. अचानक वाघोबा समोर आले अन्…पवनी तालुक्यातील कन्हाळगाव, सावरला परिसरात वाघाचा मुक्तसंचार असल्याची भीती परिसरातील नागरिकांकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत होती. सावरला परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून उमरेड-करांडला अभयारण्यालगत आहे. सावरलासह भोजापूर, खातखेडा, गुडेगाव, ढोराप, शेळी, शिंदी, कन्हाळगाव, शिरसाळा, चन्नेवाढा आदी गाव घनदाट जंगलव्याप्त असल्याने ते ताडोबा प्रकल्पाला जोडणाऱ्या कॅरिडोरचे काम करते. त्यामुळे येथील जंगलात नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून येथे वाघांचा मुक्तसंचार वाढला आहे.

जंगलव्याप्त परिसरात असलेल्या शेतांमध्ये सध्या धान कापणी व बांधणीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत वाघ दिसत असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, उदरनिर्वाहाकरिता शेतावर जाणेही गरजेचे आहे. येथे वाघ फिरत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाला याविषयी अनेकदा सूचना देऊनही त्यांच्याकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नव्हते. काही दिवसांपूर्वीच ब्रह्मपुरी येथून पवनीकडे येत असताना सावरला गावाबाहेर भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनासमोर वाघ आला होता.

हेही वाचा: ‘लिस्ट लागणार आहे, जो पैसे देईल त्याचे नाव लिहा, न देणाऱ्यांचे…’, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ

कन्हाळगाव ते सावरला मार्गावर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे व पृथ्वीराज राठोड कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीवर असताना त्यांनाही वाघ दिसून आला. ताडोबा, अंधेरी व्याघ्रप्रकल्पाच्या सीमा भागातून हा वाघ उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामध्ये आला असावा. मात्र, स्थानिक वाघांमुळे तो नवीन परिसराच्या शोधात फिरत असावा, असे सांगितले जात आहे. वन विभागाने यावर लक्ष ठेऊन सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 14:09 IST
Next Story
हृदयद्रावक! ‘त्या’ बेपत्ता चिमुकलीचा मृतदेहच आढळला