नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेची बनावट पदवी घेऊन त्या आधारे विदेशात नोकरी मिळवली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गुरुवारी विद्यापीठात अशाच प्रकारची बनावट पदवी घेऊन आलेल्या एका आरोपीला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमनकुमार सीतारामुलू बंगारू (४०), रा. पुतूरवारी, तोटामार्ग, पाचवी लाईन, गुंटूर, आंध्र प्रदेश, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर रतनबाबू आनंदराव मेकातोटी (४०), रा. नल्लापाडू आणि कांचरला रोशन कांचरला कोटेश्वरराव दोघेही रा. आंध्र प्रदेश अशी दोघा फरार आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी दोन वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परीक्षा भवनात रमनकुमार आणि रतनबाबू हे दोघे आले. त्यांनी कांचरला रोशन कोटेश्वरराव या नावाची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र विद्यापीठातील एका अधिकाऱ्याकडे सादर करीत, त्याला तातडीने सांक्षांकीत करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी ते विद्यार्थिनीचे नातेवाईक असल्याचे सांगितले. सेवेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांना दोघांच्या हालचालीवर शंका आली. त्यामुळे त्यांनी परीक्षा विभागाकडून गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दोघांनाही इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडून ठेवले व अंबाझरी पोलिसांनाही सूचना दिली. दरम्यान पोलीस पोहोचण्यापूर्वी आरोपी रतनबाबू याने तहान लागली असे सांगून खोलीच्या बाहेर पाणी पिण्यासाठी आला. येथे संधी मिळताच तो तेथून पसार झाला. त्यानंतर खबरदारी म्हणून विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या आरोपीला एका खोलीत डांबून ठेवले. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा – पाच महिन्यांत ६ रुग्णांचा बळी, गडचिरोलीत हिवतापामुळे चिंता

हेही वाचा – ‘या’ विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार

विद्यापीठाचा लोगो, कुलगुरूंची स्वाक्षरी बनावट

सदर पदवी प्रमाणपत्रावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा लोगो आणि तत्काली कुलगुरूंची इलेक्ट्राॅनिक सहीही बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे या पद्धतीने बनावट पदवी व गुणपत्रिका कोणी व कोठे तयार केली जाते, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि विद्यापीठापुढे निर्माण झाले आहे.

“रा.तु.म. नागपूर विद्यापीठात बनावट पदवी घेऊन आलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. दुसरा आरोपी पसार झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.” – विनायक गोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबाझरी पोलीस ठाणे, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job abroad on the strength of fake degree from nagpur university mnb 82 ssb