गडचिरोली : जिल्ह्यात हिवतापाचा जोर वाढत असून गेल्या पाच महिन्यांत कोरची तालुक्यात तीन चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. यातील दोन युवकांचा मृत्यू २४ जुलै रोजी झाल्याचे उघडकीस आले आहे. विशाल भारत रक्षा (२६ रा. दवंडी, धर्मपाल बळीराम पुजेरी (२५ रा. भिमपूर ) असे मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. विशाल रक्षा यास बरे वाटत नव्हते. त्यामुळे तेथील आशा वर्करने त्याला १८ जुलैला हिवतापाच्या गोळ्या दिल्या. परंतु विशालची प्रकृती आणखीनच खराब होत गेल्याने १९ जुलैला त्याला गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील डॉ. धुमनखेडे यांच्याकडे नेण्यात आले. पुढे त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच दिवशी रात्री १२ वाजता त्याला गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. २४ जुलैपर्यंत तो तेथेच भरती होता. परंतु प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्याला नागपूरला हलविले. परंतु बहेकार रुग्णालयात २५ जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा : ‘या’ विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार यापूर्वी कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एडजाल येथील शिवांगी नैताम या चार वर्षीय बालिकेचा २१ जुलैला मृत्यू झाला. त्यापूर्वी याच केंद्रांतर्गत गोडरी येथील प्रमोद नैताम (६), त्याची बहीण करिश्मा नैताम (८) यांचा १० मार्च रोजी मलेरियाने मृत्यू झाला. त्याही आधी आलोंडी येथील आरती कुंजाम या दीड महिन्याच्या बालिकेचा मलेरियाने मृत्यू झाला होता. वाको येथील बाली भुवन गंगासागर या दीड महिन्याच्या बालिकेनेही मलेरियामुळे प्राण सोडला होता. कोरची तालुक्यात दिवसेंदिवस हिवतापाचा प्रकोप वाढत आहे. या तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयात दररोज ५० हून अधिक मलेरिया सकारात्मक रुग्ण आढळत आहेत. गेल्या सात महिन्यात येथे १७० रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात ४२५२ रुग्णांचे निदान झाले आहे. हिवतापाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या १६ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरची तालुक्यातील कोटगल प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हेही वाचा : नागपूर: सायबर गुन्हे थांबविण्यासाठी सायबर क्लब डॉक्टरांची रिक्त पदे तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण तालुक्यातील रुग्ण येतात. परंतु तेथे डॉक्टरांची कमतरता आहे. बालरोग तज्ज व स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांची नितांत गरज असताना त्यांची पदे रिक्त आहे. तेथे फक्त दोन डॉक्टर कार्यरत आहेत. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळत नाही. रुग्ण कोणताही असो, 'रेफर टू गडचिरोली' अशीच परिस्थिती आहे. यापूर्वी एका गर्भवतीला चर्वीदंड ते लेकुरबोळीपर्यंत दोन किलोमीटर खाटेची कावड करून नेण्यात आले होते. गडचिरोलीला भरती केल्यानंतर तिची प्रसूती झाली. परंतु बाळ दगावले. एकूणच या तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची परिस्थिती भयावह असल्याचे दिसून येत आहे.