लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमध्ये एका उमेदवाराने स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका फोडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यासह त्याला या कामात मदत करणाऱ्या तिघांविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एमपीएससीमार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध अराजपत्रित गट ‘ब’ व गट‘क’ संवर्गातील पदभरतीकरीता रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा नवी मुंबईसह महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेला जालना येथील उमेदवार आकाश भाऊसिंग घुनावत (वय २७) याने हडपसर पुणे येथील जेएसपीएम जयवंतराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्पाय कॅमेऱ्याद्वारे जीवन नायमाने या व्यक्तीला पाठविली होती. त्यानंतर जीवन नायमाने याने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शंकर जारवाल याच्या मोबाईलवर पाठवली. मात्र त्यावेळी हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता.

आणखी वाचा-‘एमपीएससी’चा कारभार सुधरेना, आता तांत्रिक अडचणींमुळे शेकडो उमेदवार अर्जास मुकणार!

पेपर फोडणाऱ्या टोळीने आता आयोगाचाही पेपर फोडला आहे. या टोळ्यांच्या सदस्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत पण पेपर फोडल्यानंतर कठोर शिक्षा होत नसल्याने त्यांचे फावत आहे. आयोग असो किंवा सरळसेवा असेच पेपर फुटत राहिले तर प्रामाणिक उमेदवारांना नोकऱ्याच लागणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पेपरफुटीवर जन्मठेपेची शिक्षा असणारा कठोर कायदा व्हायला हवा. -स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc question paper was leak using a spy camera dag 87 mrj