लोकसत्ता टीम
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मात्र, विविध शाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर उमेदवारांना अर्ज भरताना ‘पात्र नाही’ अशा सूचना मिळत असल्याने हजारो उमेदवार पदभरतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
तंत्र शिक्षण संचालनायाअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध विभागातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकाच्या १४९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत. मात्र, हे अर्ज करताना यांत्रिकी अभियांत्रिकीसह इतर शाखांच्या उमेदवारांना अर्ज करणे अडचणीचे ठरत आहे. याचे कारण, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्येही मानव्यशास्त्र आणि सामान्य विज्ञानाचे काही विषय शिकवले जातात. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मानव्यशास्त्र आणि सामान्य विज्ञानाच्या प्राध्यापकांनाही संधी दिली जाते. उदाहरणार्थ : अभियांत्रिकीमध्ये मानव्यशास्त्रातील अर्थशास्त्र हा विषय बहूतांश विद्यार्थी निवडतात. तर सामान्य विज्ञानातील भौतिक शास्त्र या विषयाचीही अनेक विद्यार्थी निवड करतात. त्यामुळे या दोन्ही शाखांच्या पात्र उमदेवारांनाही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. पण, तसे न होता आयोगाच्या संकेतस्थळावर या शाखांच्या उमदेवारांना ‘पात्र नाही’ असा संदेश दिला जात असल्याने अर्ज करणे अडचणीचे झाले आहे. याशिवाय अन्य काही शाखांच्या उमेदवारांनाही अर्ज करताना अशाच अडचणी येत आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आयोगाच्या मदत केंद्राशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
आणखी वाचा-ना ग्रामसभा, ना निधी खर्च, विकासाचा खेळखंडोबा; वाशिम जिल्ह्यातील एकांबा ग्रामपंचायतमध्ये सावळा गोंधळ
विद्यार्थ्यांची अडचण बघता आयोगाने १५ सप्टेंबरला सुधारित शैक्षणिक पात्रता जाहीर केली. यामध्ये मानव्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान शाखेचा समावेश करण्यात आला. मात्र, यानंतरही अर्ज करताना ‘पात्र नाही’ असाच संदेश येत आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या सचिवांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.