बुलढाणा : मागील काही काळापासून असलेले मतभेद, दुरावा विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलढाणा मतदारसंघातील अपक्ष तथा संघटनेचे जुनेजाणते कार्यकर्ते रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांनी एक पाऊल मागे घेत तुपकरांसोबत आपले मागील काळात मतभेद होते, मनभेद नाही, हे सूचित केले आहे.

‘स्वाभिमानी’ चे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यावतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्धी केले आहे. त्यानुसार, स्वाभिमानी संघटनेशी संलग्न स्वाभिमानी पक्षाच्यावतीने हातकणंगले, बुलढाणा, सांगली, परभणी मतदारसंघात ‘आपले उमेदवार’ लढत आहेत. पक्ष कोणत्याही आघाडीत नसून स्वबळावर लढत आहे. यामुळे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उमेदवारांचा प्रचार करावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

हेही वाचा…तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात

‘स्वबळावर’ समर्थन देऊ नये

या पाठिंब्याबरोबरच इतर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना राजू शेट्टी यांनी तंबी देखील दिली आहे. इतर मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना न विचारता कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा देऊ नये, असे आदेश राजू शेट्टी यांनी दिले आहे. तसे केल्यास त्यांच्याविरुद्ध संघटनेकडून कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.