नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी सकाळी एक ई मेल आला. या मेलमध्ये धमकीचा उल्लेख असल्याने सुरक्षा यंत्रणेची धावपळ झाली. सतर्कता म्हणून नागपूर खंडपीठाने या ई मेलची माहिती मुंबई उच्च न्यायालयालाही दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ई मेलची न्यायालय परिसर आणि पोलीस वर्तुळात धास्ती होती. यापूर्वी मार्च महिन्यातसुद्धा अशाच प्रकारची बॉम्बस्फोट करण्याची धमकी मिळाली होती. त्या प्रकरणात जरीपटक्यातील ओमप्रकाश वासवानी या युवकाला ताब्यातही घेण्यात आले होते, हे विशेष.

मंगळवारी सकाळी ११.१० वाजताच्या सुमारास उच्च न्यायालय प्रशासनाला एक ई मेल प्राप्त झाला. त्यात बॉम्बस्फोट, आरडीएक्स असा उल्लेख आहे. मात्र, वाक्य रचना बरोबर नाही. वाक्य जुळत नसल्याने त्या मेलचा नेमका अर्थ लावता येत नाही. इंग्रजी भाषेत असलेला हा मेल एक पानाचा आहे. या मेलसंदर्भात सर्वप्रथम सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

विषय गंभीर असल्याने बॉम्बशोध व नाशक पथक, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सोबतच सदर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दरम्यान अशाच आशयाचा मेल छत्रपती संभाजीनगरलादेखील प्राप्त झाला. बीडीडीएस, श्वान पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला तसेच येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेही न्यायालय परिसरात पास आणि चौकशी केल्याशिवाय प्रवेश मिळत नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी या ई मेलची पडताळणी आणि खरा पत्ता मिळविण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. सायबरकडून माहिती मिळाल्यानंतर सदर पोलीस कारवाई करतील. तत्पूर्वी पोलिसांनी कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयालाही कळविले असून, सतर्क राहण्यास सांगितले आहे, तर दुसरीकडे एटीएसचे पथकही सतर्क झाले आहे.

न्यायालय परिसरात बेवारस बॅग

न्यायालय परिसरात एका कारजवळ बेवारस बॅग असून, त्यातून ईलेक्ट्रॉनिक्स यंत्रासारखा आवाज येत असल्याचे सुरक्षा पथकाला समजले. पथकाने लगेच सदर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना माहिती दिली. ठाकरे पथकासह न्यायालय परिसरात पोहोचले. बीडीडीएस आणि श्वान पथक येईपर्यंत ठाकरे आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी तेवढा परिसर रिकामा करून सुरक्षा वाढविली.

बॉम्ब शोध व नाशक पथकासह श्वान पथक आल्यानंतर कारजवळील बेवारस बॅग उघडली असता त्यात मोबाईल आणि कागदपत्रे सापडली. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली असून, चौकशी केली असता ती बॅग एका वकिलाची असल्याचे समजले. धावपळीत ते बॅग विसरले असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threatening email recieved to nagpur high court administration containing words bombblast rdx adk 83 asj