नागपूर : पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्थमा (दमा) आजाराचे प्रमाण जास्त आहे. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाच्या अभ्यासातून हा प्रकार पुढे आला आहे. ७ मे रोजी जागतिक अस्थमा दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ७ हजार ३५० रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. क्रिम्स रुग्णालयाच्या निरीक्षणानुसार एकूण अस्थमाची तक्रार घेऊन आलेल्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या ४७ टक्के तर महिलांची संख्या ५३ टक्के आहे. सर्वत्र वाढणाऱ्या धूम्रपानासोबतच चुलीवर व जळणावरील धूर, वायू प्रदूषण, घरातील मच्छर अगरबत्ती, औद्योगिक प्रदूषणामुळे अस्थमाच्या रुग्णात वाढ होत आहे.

अभ्यासात अस्थमाच्या प्राथमिक टप्प्यात केवळ ९ टक्केच रुग्ण उपचाराला आले. तर दुसऱ्या टप्प्यात ५८ टक्के तर तिसऱ्या गंभीर टप्प्यावर ३४ टक्के रुग्ण उपचाराला आले. एकूण गंभीर संवर्गातील रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण हे चाळिशी पार केलेले आहेत. या अभ्यासातून एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आली असून त्यानुसार अस्थमाच्या पहिल्या प्राथमिक टप्प्यात रुग्ण उपचाराला आल्यास योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात रुग्ण उपचाराला आल्यास रुग्णाचा आजार नियंत्रणात राहत असून त्याला आयुष्यभर औषधी घेण्याची गरज भासत असल्याचेही ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.

हेही वाचा : नागपूर : महापालिकेकडूनच अतिक्रमणाचा ‘छुपा’ परवाना? खाद्यापदार्थ विक्रेते जुमानेना

१३ टक्के रुग्ण २० वर्षांहून खालच्या वयाचे

अभ्यासात एकूण रुग्णांपैकी ४४ टक्के रुग्णांमध्ये ॲलर्जिक अस्थमा आढळला आहे. अस्थमाचे १३ टक्के रुग्ण हे २० वर्षांहून कमी वयातील आहेत, तर ३१ टक्के रुग्ण हे २० ते ४० वयोगटातील आहेत. ५७ टक्के रुग्ण हे वयाची चाळिशी ओलांडलेले असल्याचेही अभ्यासातून पुढे आले आहे.

हेही वाचा : शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

धूम्रपान, प्रदूषणासह इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष दिल्यास अस्थमा बरा होऊ शकतो. नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या, नियमित व्यायामासह सांगितलेल्या बाबींचे पालन करा.

डॉ. अशोक अरबट, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, क्रिम्स रुग्णालय, नागपूर.