Premium

नाशिकमध्ये वसतिगृहासाठी सारथी संस्थेला जागा उपलब्ध करण्याचे निर्देश

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनींसाठी शहरात वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे.

health minister tanaji sawant, sarathi organization, sarathi hostel in nashik, land for hostel sarathi
नाशिकमध्ये वसतिगृहासाठी सारथी संस्थेला जागा उपलब्ध करण्याचे निर्देश (संग्रहित छायाचित्र)

नाशिक : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्यावतीने (सारथी) शहरात मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रस्तावित वसतिगृहासाठी आरोग्य विभागाची पाच हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जागेअभावी वसतिगृहाचे रखडलेले काम सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनींसाठी शहरात वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुरावातून त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी मौजे नाशिक गट क्रमांक १०५६-१०५७/१ मधील ०.५० आर (५००० चौरस मीटर) ही जमीन हस्तांतरण करण्याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला होता. शहराच्या मध्यवर्ती त्र्यंबक रस्त्यावरील ही जागा आहे. या संबंधीचा प्रस्ताव अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे वसतिगृहाचे बांधकाम रखडले होते.

हेही वाचा : शास्त्रोक्त पद्धतीने केळी व्यवस्थापन न केल्यास भवितव्य धोक्यात, फैजपूर परिसंवादात डॉ. के. बी. पाटील यांचा इशारा

यासंदर्भात आमदार फरांदे, खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी मुंबई येथे आरोग्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. मराठी मुलांच्या वसतिगृहासाठी खास बाब म्हणून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याची दखल घेऊन आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या नावे असणारी जागा खास बाब म्हणून सारथी संस्थेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती भागात सुसज्ज व सुविधांनी युक्त वसतिगृहाचे काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास खासदार गोडसे, आमदार फरांदे यांनी व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nashik health minister tanaji sawant directed officials to avail land for sarathi organization to build hostel for students css

First published on: 04-10-2023 at 17:11 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा