लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना होत असलेल्या त्रासाकडे माध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत सोयी सुविधांची पाहणी केली. श्रावण महिन्यात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने त्यांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी काही सूचना केल्या.

नाशिक येथील ॲड. महेंद्र सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांना रविवारी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली. देवस्थानच्या वतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ॲड. सूर्यवंशी यांनी केला. देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षारक्षकच जर भाविकांना त्रास देत असतील आणि देवस्थान याविषयी केवळ बघ्याची भूमिका घेणार असेल तर दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित होत आहे. रविवारच्या प्रकरणानंतर सोमवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आषाढी वारीसाठी त्र्यंबक येथील संत निवृत्तीनाथ मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्र्यंबक देवस्थानला भेट देत तेथील उपाययोजनांची माहिती घेतली.

आणखी वाचा-खासगी वीज वितरण कंपनीविरोधात मालेगावात आंदोलन

भाविकांची गर्दी होत असतांना दर्शनासाठी होणारा गोंधळ पाहता श्रावणात तर ही गर्दी मोठ्या प्रमाणावर असेल, अशावेळी कमी वेळात जास्तीजास्त भाविकांना कसे दर्शन घेता येईल, या अनुषंगाने काय नियोजन असेल, यासाठी देवस्थानला जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. याठिकाणी वाहनतळ परिसरात दलालांकडूनही भाविकांची दर्शनाच्या नावाखाली लूट होत असते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशाच्या कमानीजवळ भाविकांसाठी आवश्यक सूचना करण्यात येतील, ठिकठिकाणी मार्गदर्शक सूचना फलकांच्या माध्यमातून लावण्यात येणार आहेत. देश,विदेशासह स्थानिक पातळीवर देवस्थान परिसरात देवदर्शनासाठी काही आगाऊ नोंदणी करता येईल का, भाविकांची गैरसोय न होता नाशिक शहराची चांगली प्रतिमा जनमानसात जावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

आणखी वाचा-नंदुरबार : बकरी ईदसाठी जात असताना अपघातात दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

देवस्थानकडून कार्यवाहीची गरज

त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरात दर्शनाच्या नावाखाली विश्वस्त, सुरक्षारक्षकांकडून होणारी लूट, तेथील व्यावसायिकांची मनमानी याविषयी स्थानिक पातळीवर सातत्याने आवाज उठविला जातो. परंतु, दोन-तीन दिवस चर्चा झाल्यानंतर सर्व काही आलबेल असल्याचा दावा मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येऊन विषयावर पडदा टाकला जातो. याआधीही भाविकांना मारहाण, शिवीगाळ झाली आहे. परंतु, देवस्थान याबाबत कठोर भूमिका घेत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली.