गंगाखेडच्या रासपच्या जागेवर भाजपची कुरघोडी; दोन केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घातल्याने आमदार गुट्टे अडचणीत|bjp tussle on gangakhed rsp seat mla ratnakar gutte in trouble as two union ministers pointed out in parbhani | Loksatta

गंगाखेडच्या रासपच्या जागेवर भाजपची कुरघोडी; दोन केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घातल्याने आमदार गुट्टे अडचणीत

भाजपचे कार्यकारिणी सदस्य असलेले संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेडला भव्य असा कार्यक्रम २६ नोव्हेंबरला पार पडला. या कार्यक्रमात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

गंगाखेडच्या रासपच्या जागेवर भाजपची कुरघोडी; दोन केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घातल्याने आमदार गुट्टे अडचणीत
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

आसाराम लोमटे

परभणी : सध्या गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत, मात्र रासपचे नेते महादेव जानकर व भारतीय जनता पक्ष यांच्यात पडत चाललेल्या अंतराच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे यांनी नुकतेच गंगाखेड येथे केलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे भाजपच्या आगामी रणनीतीची पायाभरणी असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड या दोघांनीही गंगाखेडची जागा भारतीय जनता पक्षाला सोडवून घेण्याचा शब्द तर मुरकुटे यांना दिलाच, पण त्यांना ‘कामाला लागा’ असा संदेश देत या मतदारसंघात उद्याचा आमदार हा भाजपचा असेल अशी ग्वाही देऊन टाकली आहे.

भाजपचे कार्यकारिणी सदस्य असलेले संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेडला भव्य असा कार्यक्रम २६ नोव्हेंबरला पार पडला. या कार्यक्रमात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मतदारसंघातून मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमाला हजर होते. विशेष म्हणजे दानवे, कराड हे भाजपचे दोन केंद्रीय राज्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. शिवाय भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाची सर्व नेतेमंडळी व पदाधिकारी या कार्यक्रमाला झाडून पुसून हजर होते. दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मुरकुटे यांना कामाला लागा असे थेट सांगितल्याने या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष तयारीला लागल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा: पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या मोदींच्या धोरणाला गती; दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपकडून चार उमेदवार रिंगणात

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. या पक्षाचे नेते असलेल्या महादेव जानकर यांचे सध्या भारतीय जनता पक्षाशी बिनसत चालल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गंगाखेडची जागा भाजपच्या वतीने पुढील निवडणुकीत रासपला सोडली जाण्याची शक्यता कमी आहे. उलट गंगाखेडसह जिल्ह्यातील चारही विधानसभा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व शक्तीनिशी कामाला लागण्याचे आवाहन मुरकुटे यांच्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी केले आहे. गंगाखेडची जागा आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सोडवून घेण्यासंदर्भात पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी ग्वाही दिल्याने आगामी निवडणुकीत गंगाखेडची जागा रासपकडून भारतीय जनता पक्ष ताब्यात घेण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा भाजपमधील नेते व कार्यकर्त्यांमधील मतभिन्नता ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर उघड

गेल्या आठ वर्षापासून आपण गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहोत. पक्षाने आपल्याला उमेदवारीची संधी दिल्यास कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवू, असे या वेळी मुरकुटे यांनी घोषित केले. रासप हा भाजपचा मित्रपक्ष आहे. महायुतीतही हा घटक पक्ष होता. रासपच्या या जागेवर आता भाजपने कुरघोडी करण्याचा इरादा जाहीर केल्याने भविष्यात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासमोरही नवा पेच उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर गुट्टे यांच्यासमोर काय पर्याय राहतील आणि भाजपने केलेल्या या मोर्चेबांधणीला ते भविष्यात कसे सामोरे जातील याबाबत मोठे औत्सुक्य आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:41 IST
Next Story
पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या मोदींच्या धोरणाला गती; दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपकडून चार उमेदवार रिंगणात