अमरावती : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्‍या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्‍या विरोधात ‘इंडिया’ आघाडीत जागा कोणाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही संभ्रमावस्‍था आहे. ‘एनडीए’च्‍या संभाव्‍य उमेदवार म्‍हणून विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालवली असताना ‘इंडिया’चे प्रादेशिक पातळीवरील घटक असलेल्‍या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी अमरावतीवर दावा सांगितल्‍याने आरंभालाच पेच निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनीत राणा या गेल्‍या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आल्‍या होत्‍या. पण, त्‍यांनी लगेच केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिल्‍याने त्‍यांचा कल स्‍पष्‍ट झाला होता. २०१४ च्‍या निवडणुकीत त्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या उमेदवार होत्‍या. त्‍यामुळे आता राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाने अमरावतीवर दावा सांगितला आहे. याआधी शिवसेनेच्‍या ठाकरे गटाने अमरावतीतून उमेदवारीची इच्‍छा प्रदर्शित केली होती, तर काँग्रेस पक्षानेही निवडणूक लढविण्‍याची तयारी केली आहे. अशा स्थितीत जागा कुणाला मिळणार, याची उत्‍सुकता ताणली गेली आहे.

हेही वाचा : रायगडातील शिवसेना भाजपमधील वादात देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी होणार का ?

राज्यातील राजकीय समीकरणे बदल्याने अमरावती शहरातील गणितेही बदलणार आहेत. शहरात ताकद असलेल्या राष्‍ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजपसोबत गेला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्‍ही गटांचे कार्यकर्ते विखुरले गेले आहेत. शहराच्‍या राजकारणावर पकड ठेवून असलेले संजय खोडके हे अजित पवार गटात आहेत, तर हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे हे नेते शरद पवारांसोबत आहेत. सध्‍या दोन्‍ही गटांमध्‍ये शांतता आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचे निश्चित केले आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. अमरावतीची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार) यापैकी एका मिळेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. त्‍यामुळे शिवसेनेतर्फे निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या इच्‍छूकांमध्‍ये अस्‍वस्‍थता आहे.

वरिष्‍ठ पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या यासंदर्भात संघटनात्मक बैठका पार पडल्या असून महत्त्वाच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीची पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे या तीन पक्षांमधला समन्वय कायम राहणे हे देखील महाविकास आघाडीसमोर एक मोठे आव्हान आहे.

हेही वाचा : पुण्यात मुरलीधर मोहोळ – जगदीश मुळीक यांचे उमेदवारीसाठी असेही शक्तिप्रदर्शन !

महाविकास आघाडीकडून अनेक इच्‍छूक उमेदवार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात बंडखोरी होण्याची भीती सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. स्पर्धेतल्या उमेदवारांना शांत करणे, त्यांची समजूत काढणे यासाठी मविआची कसोटी लागणार आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात २०१९ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभवाची धूळ चारली होती. नवनीत राणा यांना ५ लाख १० हजार ९४७ मते मिळाली होती, तर अडसूळ यांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते प्राप्‍त झाली होती. २०१४ च्‍या निवडणुकीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता. अडसुळांना तेव्‍हा ४ लाख ६७ हजार २१२ तर नवनीत राणांना ३ लाख २९ हजार २८० मते मिळाली होती. नवनीत राणांच्‍या मतांमध्‍ये भरघोस वाढ झाल्‍याचे चित्र गेल्‍या निवडणुकीत होते. आता त्‍या राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीच्‍या पाठिंब्‍यावर निवडणूक लढण्‍याच्‍या तयारीत आहेत, तर भाजपला या ठिकाणी पक्षचिन्‍ह हवे आहे. अशा स्थितीत आगामी काळात काय घडामोडी होतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati confusion in india alliance to declare the lok sabha candidate against the nda and navneet rana print politics news css
First published on: 28-11-2023 at 12:09 IST