नगर : जिल्ह्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला हक्काचा मतदारसंघ नसल्याने महाविकास आघाडीमधील विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत पक्षाची काहीशी कोंडी झाल्यासारखी परिस्थिती आहे. सन २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार विजयी झाला नाही, तर सन २०१४ च्या निवडणुकीत केवळ पारनेर मतदारसंघात पक्षाचा आमदार विजय झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डाव्या चळवळींचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यावर नंतर काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व निर्माण केले. मध्यंतरी युती सरकारच्या काळातही भाजप-सेना युतीने काँग्रेस व राष्ट्रवादीशी बरोबरी साधली होती. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्राबल्य कायम राहिले. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही नगर जिल्ह्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक म्हणजे सहा जागांवर आमदार निवडले गेले. काँग्रेसचे दोन, बाळासाहेब थोरात (संगमनेर) व लहू कानडे (श्रीरामपूर) आमदार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व काँग्रेस या दोघांकडून आपापल्या पूर्वीच्या जागांवर हक्क सांगितला जातो आहे.

हेही वाचा : उमेदवारांच्या पोकळीमुळे ‘पलीकडे’ इच्छुकांना निमंत्रण – अजित पवार

नेवासा मतदारसंघातून आमदार शंकरराव गडाख अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा देत त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. या आधारावर राष्ट्रवादीचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नेवासा मतदारसंघाची जागा आमचीच असल्याचे जाहीर केले आहे. परंतु आमदार गडाख यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला, मंत्रिपदही मिळवले. परंतु ते पुन्हा अपक्ष म्हणून लढणार, की शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) नव्या पक्षचिन्हावर, याची स्पष्टता झालेली नाही. शिवाय ते जिल्ह्यातील शिवसेनेपासून (उद्धव ठाकरे) अंतर राखून आहेत. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी नगर शहर मतदारसंघावर दीर्घकाळ राज्य केले. मात्र, नंतर त्यांचा सलग दोन वेळा पराभव झाला आणि मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. नगर महापालिकेत शिवसेनेची अनेकदा सत्ता आली. त्याचाच आधार घेत शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) ‘मविआ’मधील जागावाटपात दावा केला जातो आहे. सन २०१४ मध्ये पारनेरमधून शिवसेनेचे विजय औटी विजयी झाले होते.

मात्र, सन २०१९ मध्ये त्यांच्याविरोधात बंड करत राष्ट्रवादीकडे गेलेले नीलेश लंके विजयी झाले. लंके नंतर खासदार झाले. आता लंके यांनी त्यांची पत्नी, माजी जि. प. सदस्य राणी लंके यांच्यासाठी पारनेरच्या जागेवर दावा केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena uddhav thackeray faction ahmednagar assembly election seat allocation print politics news css