गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने यासंदर्भातला निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार काही ठिकाणी या शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही ठिकाणी तो अद्याप प्रलंबित होता. या पार्श्वभूमीवर पुण्याबाबत नेमका काय निर्णय होणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात रुग्णसंख्येत घट!

पुण्यात आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोनासंदर्भातली आढावा बैठक झाली. यावेळी पुण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुण्यात रुग्णसंख्येत घट होत असल्याचं अजित पवार म्हणाले. “पुण्यात नवीन रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. काही राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे. पण महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवस रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती अजून कमी व्हावी अशी अपेक्षा आहे”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

शाळा-महाविद्यालयांचं काय?

दरम्यान, रुग्णसंख्येत घट होत असताना पुण्यातील शाळा-महाविद्यालयांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यासंदर्भात येत्या १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. मात्र, पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग फक्त चार तास भरतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात मास्कपासून मुक्ती मिळणार? चर्चांना आदित्य ठाकरेंनी दिला पूर्णविराम, म्हणाले…

“पालकांना विनंती आहे की मुलांना शाळेत पाठवताना आम्ही शाळा-कॉलेज सुरू केले असले, तरी अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही स्वत: त्यांचे आई-वडिल आहात. आम्ही तिथे सगळ्या नियमांचं पालन करून या गोष्टी करणार आहोत. पहिली ते आठवीपर्यंत ४ तासच शाळा भरवली जाणार आहे. ९वीपासून पूर्णवेळ शाळा सुरू होतील. मास्क काढूच नये. पुण्यात शाळा आणि महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. राज्यात देखील १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत”, असं ते म्हणाले.

मास्कबाबत कोणतीही चर्चा नाही..

दरम्यान, राज्यात मास्कसंदर्भातले निर्बंध हटवण्याची कोणतीही चर्चा मंत्रीमंडळ बैठकीत झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “मंत्रीमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही अशी चर्चा झाल्याचं वृत्त आलं. पण हे धादांत खोटं आहे. तशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मास्क वापरलाच पाहिजे. करोना काळात तसा निर्णय बाहेरच्या देशांनी घेतला असेल. तो त्यांना लखलाभ. पण आपल्या राज्यात तशा प्रकारची चर्चाही नाही. तसा कुठला निर्णयही झालेला नाही. कृपा करून लोकांमध्ये कुणीही गैरसमज पसरवू नये”, असं ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on mask use schools collages to reopen in pune 1st feb pmw
First published on: 29-01-2022 at 10:46 IST