पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वाद वाढताना दिसून येत आहे. अजित पवार हे आमदारांना भेटत नाहीत. अजित पवार आमदारांना विश्वासात घेत नसून बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जाते त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना विचारा सर्वात जास्त भेटणारे अजित पवार आहेत. आज पावणेसात वाजताच कार्यक्रमासाठी आलो होतो उजाडले पण नव्हते. काही लोक वेगळ्या चष्म्याने बघतात त्याबद्दल काय बोलणार? ती मोठी माणसे आहेत आणि आम्ही लहान आहोत,” असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.

त्याआधी पुणे शहरात वाढत असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना काही उपाययोजना सुचवल्या होत्या. पुण्यातल्या करोना पार्श्वभूमीवर बेसावध राहून चालणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

“निवडणुकीआधी मीच चर्चा करुन त्यांना..”; अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन अजित पवारांची प्रतिक्रिया

करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी शहरात शाळा सुरू कराव्या लागतील, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी पवारांना दिला होता. यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळेने ४० विद्यार्थ्यांच्या वर्गात १० विद्यार्थ्यांना बोलावले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय काल सरकारने घेतला आहे. त्यानंतर पुण्यात शाळा सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली असून अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली होती. “सर्वांना विचारात घेऊन आम्ही करोना आपल्यात वाढू नये यासाठीच निर्णय घेत असतो. सध्या ७३ हजार सक्रिय रुग्ण असून कालची एका दिवसातील आकडेवारी १६ हजार इतकी आहे. या आकडेवारीवरून करोना बाधित दर २७ टक्के इतका आहे. त्यामुळे अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत,” असे अजित पवार म्हणाले.

“करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. रुग्णालयांमध्ये बेड रिकामे आहे.. खाजगी हॉस्पिटलच्या तक्रारी येत आहेत त्याबाबत कारवाई करुन कोणालाही त्रास होणार नाही हे पाहू. जिल्ह्यात लसीकरणबाबत गांभीर्याने घेत आहोत. जिल्हयात एक कोटी ६९ लाखपर्यंत डोस झाले आहेत. तर ग्रामीण भागात ७५ टक्के आणि पुणे, पिंपरीत ५१ टक्के लसीकरण झाले आहे.शनिवारी, रविवारी ६० वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस मिळणार आहे,” असे अजित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reply to chandrakant patil saying that guardian minister does not meet mla abn 97 svk
First published on: 22-01-2022 at 14:19 IST