पुणे : स्टील, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याचे दर आता गगनाला भिडले असल्याने बांधकाम व्यावसायिकांना घरे बांधणे परवडत नाही, त्यामुळे बांधकाम बंद ठेवण्याचा इशारा क्रेडाई महाराष्ट्रने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि मेट्रो सेस याचा थेट परिणाम गृह खरेदीदारांवर होणार असल्याचे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी शुक्रवारी सांगितले. बांधकाम साहित्यापैकी महत्त्वाचा घटक असलेले स्टील, सिमेंट, चार इंचाच्या विटा, वाळू आणि वॉश सॅण्ड, इलेक्ट्रिक वायर, फिटिंग्स, टाईल्स, पाईप, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, रेती, गौण खनिज, मुरूम, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजुरी यात साधारणत: ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही वाढ नैसर्गिक आहे,की साठेबाजी किंवा नफेखोरीमुळे होत आहे, याची सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सामान्य गृह खरेदीदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी फुरडे यांनी केली आहे. पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर येथील सर्व मालमत्ता खरेदीवर  १ एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार पुन्हा लागू होण्याची शक्यता असून संघटनेचा त्याला विरोध आहे.

घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांवर अधिभाराचा थेट परिणाम होणार आहे. क्रेडाई महाराष्ट्रचा या प्रस्तावाला तीव्र विरोध असून सरकारने या निर्णयावर फेरविचार करावा असे आवाहन फुरडे यांनी केले आहे. यासंदर्भात क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले आहे.

सातत्याने होणारी कच्च्या मालाच्या किमतीतील दरवाढ, मेट्रो सेस याचा थेट परिणाम गृह खरेदीदारांवर होणार आहे. यासंदर्भात शासनाने योग्य ती कार्यवाही करून सर्वसामान्य जनतेस त्याची झळ पोचणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न हे कधीही प्रत्यक्षात उतरणार नाही.

सुनील फुरडे, अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credai maharashtra warns to stop construction due to rising rates zws