Hinjewadi IT Park Traffic Jam समस्येच्या सोडवणुकीच्या जबाबदारीबाबत सरकारी यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवली, की समस्या कशी ‘जैसे थे’ राहते, याचा अनुभव सध्या हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कर्मचारी घेत आहेत. आयटी पार्कमधील वाहतुकीची समस्या सोडविण्याची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी), आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीची, की पिंपरी-चिंचवड महापालिकेची हेच आता कळेनासे झाल्याचे चित्र आहे.

हिंजवडीतील आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक संघटना सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना न झाल्याने पावसाळ्यात आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या आणखी वाढली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून, पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणे, खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होणे असे चित्र दिसत आहे.

हेही वाचा : बनावट दूरध्वनी केंद्रासाठी सात हजार सीमकार्डचा पुरवठा; ‘एटीएस’कडून आणखी दोघांना अटक

या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने ‘पीएमआरडीए’ आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसमवेत आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची नुकतीच पाहणी केली. सुरुवातीला यात ‘एमआयडीसी’कडे बोट दाखविण्यात येत होते. मात्र, पाहणीत ‘पीएमआरडीए’शी निगडित अनेक गोष्टी कोंडीसाठी कारणीभूत असल्याची बाब समोर आली. यानंतर ‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम करणाऱ्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीला नोटीस बजावली. प्रत्यक्षात या मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’च्या देखरेखीखाली सुरू असताना अशी नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येक यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कोंडी वाढत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने शोधलेली कोंडीची कारणे

  • मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यांच्या कडेच्या असलेल्या नाल्यात टाकून ते बुजविण्यात आले.
  • रस्त्याच्या कडेला राडारोड्याचे ढीग टाकण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचत आहे.
  • पीएमआरडीएने रस्त्याच्या कडेला बांधकाम परवानग्या दिल्या. परंतु, बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यापेक्षा उंचीवर बांधकाम केल्याने पाणी साचत आहे.
  • बांधकाम परवानग्या दिल्यानंतर त्यांच्यावर ‘पीएमआरडीए’ने योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवले नाही.
  • ग्रामपंचायतींच्या हद्दीत सांडपाणी व्यवस्था नाही.
  • अनेक ठिकाणी बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्रिपदाच्या ‘बिहार पॅटर्न’ची अफवा; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात आहेत. मेट्रोच्या कामासाठी काही रस्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीची आहे. हे रस्ते सुस्थितीत आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याचे कामही त्यांचेच आहे.

डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’च्या देखरेखीखाली सुरू असले, तरी रस्त्यांची खराब अवस्था झाल्याने कंत्राटदार कंपनीला नोटीस बजवावी लागली. रस्ते व्यवस्थित ठेवण्याचे काम कंत्राटदार कंपनीचे आहे. त्यांच्याकडून आता रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

सध्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडकडून रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यांवर पाऊस पडल्यास पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. त्यामुळे तिथे पुन्हा पाणी साचून हे रस्ते खराब होणार आहेत. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था प्राधान्याने करायला हवी होती. मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून केवळ वरवरची मलमपट्टी केली जात आहे.

लेफ्टनन्ट कर्नल (निवृत्त) योगेश जोशी, सचिव, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन