पुणे : आर्थिक वर्ष संपले तरी, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात स्व-मालकीच्या २०० बस खरेदी करण्याचा मुहूर्त लागलेला नाही. तसेच खासगी तत्वावरील बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रियाही विलंबाने होत आहे. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या २८३ बस अद्यापही शहरातील विविध ररस्त्यांवरून धावत आहेत. मार्च महिन्यापर्यंत पीएमपी’च्या खासगी तत्वावरील ४०० पैकी केवळ ९४ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत, तर एकही आयुर्मान संपलेली बस मोडीत काढण्यात आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे, पिंपरी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या ‘पीएमपी’च्या ताफ्यात गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणे २८३ बसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यानुसार वर्षभरात टप्प्याटप्प्याने या बस मोडीत काढण्यात येणार होत्या. मात्र, नवीन बस ताफ्यात दाखल होण्यास विलंब झाल्याने या बस अद्यापही सेवेत आहेत. शहरातील विविध रस्त्यांवरून बसचे मार्गक्रमण सुरू असून अनेकदा बस बंद पडणे, प्रवाशांचा खोळंबा होणे, मनस्ताप आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी अशा समस्यांना सामोरे जावे लागत असून पीएमपीच्या वित्तीय तुटमध्येही हे एक प्रमुख कारण आहे.

‘पीएमपी’च्या ताफ्यात स्व-मालकीच्या ९६४ बस आहेत, तर खासगी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या १०१९ अशा एकूण एक हजार ९८३ बस रस्त्यांवरून धावत आहेत. त्यापैकी २८३ बसचे आयुर्मान आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संपणार असल्याचे जाहीर करण्यात आले, तर ६०० नवीन बस ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन ‘पीएमपी’ प्रशासनाने केले होते. मात्र, नवीन बस ताफ्यात दाखल होण्याल विलंब होत असल्याने आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढता येत नसल्याचे स्पष्टीकरण देत, टप्प्याटप्प्याने नवीन बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, असे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘पीएमपी’च्या ताफ्यातील २८३ बसचे आयुर्मान संपले आहे, तर ६०० बस नव्याने घेण्याचे नियोजन आहे. खासगी तत्वावरील ४०० पैकी ९४ बस सेवेत दाखल झाल्या असून लवकरच टप्प्याटप्प्याने उर्वरीत बस दाखल होती. पीएमपी’ स्व-मालकीच्या २०० बस घेण्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

पीएमपी बसचा आढावा

  • पीएमपीच्या ताफ्यातील एकूण बस – ९६४
  • खासगी तत्वावरील एकूण बस – १०१९
  • रस्त्यावर धावणाऱ्या एकूण बस – १०१९
  • आयुर्मान संपलेल्या बस – २८३
  • स्व-मालकीच्या प्रतीक्षेतील बस – २००
  • खासगी तत्वावरील प्रतीक्षेतील बस – ३०६
  • नव्याने दाखल झालेल्या बस – ९४ (खासगी)
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pmpml buses damaged condition pmc bus procurement delayed pune print news vvp 08 css