पिंपरी- चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रोफाइल आणि डीपीला फोटो ठेवणारे लोक अतिशय अश्लील भाषा वापरून कमेंट कशी करू शकतात? असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरून सोशल मीडियावर काही जणांनी कमेंट आणि पोस्ट केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे. याच प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रूपाली चाकणकर या पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

रूपाली चाकणकर यांच्या बद्दल सोशल मीडिया तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर अश्लील पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या 32 जणांची लिस्ट सायबर पोलिसांना देण्यात आली होती. पैकी, दोघांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यावर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काम करत असताना आमचे विचार आणि भूमिका नेहमी मांडत असतो. त्यामुळे विचारांची लढाई ही विचारांनीच लढावी. त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? ती वैचारिक भूमिका तुम्ही मांडू शकतात. परंतु, काही जण अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील भाषा वापरत पोस्ट आणि कमेंट करतात. यामध्ये प्रोफाइल आणि डीपीला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवणारे लोक अश्लील भाषा वापरतात कशी? असा प्रश्न देखील या निमित्ताने रूपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा-अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल; पीडिता गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघड

त्या पुढे म्हणाल्या, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे. अश्लील भाषा ही जनतेला पटणार नाही. त्या कायद्याच्या चौकटीमध्ये देखील बसत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींवर कडक कारवाई आणि कठोर कलम लावण्यात आलेली आहेत. अशा गोष्टींपासून महिलांनीदेखील सतर्क व्हायला पाहिजे असं आवाहन रूपाली चाकणकर यांनी केलं आहे.