माउलींची पालखी संत सोपानकाकांच्या नगरीत ; – दिवे घाटातील अवघड टप्पा लीलया पार

पुण्यामध्ये पहाटे माऊलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले

sant tukaram palkhi
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी रात्री आठ वाजता सोपानकाकांच्या सासवड नगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन झाले.

प्रकाश खाडे, जेजुरी

टाळ मृदंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा माउली..तुकाराम…..’असा जयघोष करीत अवघड दिवेघाट पार करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी रात्री आठ वाजता सोपानकाकांच्या सासवड नगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन झाले.

पुण्यामध्ये पहाटे माऊलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. पुणे ते सासवड हा ३० किलोमीटरचा टप्पा मोठा असल्याने पालखी सोहळा वेगात पुढे चालत होता. सकाळी हडपसर येथे पालखी सोहळा पोहोचला, या वेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ वाटण्यात आले. पुणे ते दिवे घाटापर्यंत पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. माऊलींचा हा सोहळा दुपारी दोन वाजता वडकीनाला येथे पोहोचला. तेथे वारकऱ्यांनी दुपारचा फराळ व विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर दुपारी ३.३० वाजता पालखी सोहळ्याने अवघड दिवे घाट चढण्यास सुरुवात केली.

वैष्णवां संगती सुख वाटे जीवा

आणिक मी देवा काही नेणी ॥

गाये नाचे उडे आपुलिया छंदे

मनाच्या आनंदे आवडीने ॥

दिवे घाट चढणे अवघड असल्याने माऊलींच्या रथाला वडकी, फुरसुंगी येथील दोन बैलजोड्या जोडण्यात आल्या. विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदंगाचा आवाज अशा भारावलेल्या वातावरणात वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली. अनेक दिंड्यांमध्ये टाळ-मृदंगाच्या तालावर निरनिराळे अभंग-गीते गायली जात होती, त्यामुळे साऱ्यांचाच उत्साह द्विगुणित होत होता. या वेळी बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वैष्णवांसमवेत घाट चढण्याचा आनंद लुटला. ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा होता. उन्हाचा त्रास जाणवला नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे वारी घडली नव्हती, त्यामुळे वारी अनुभवायला मिळाल्याचे समाधान वैष्णवांच्या चेहऱ्यावर होते. दिवे घाट हिरवाईने नटलेला आहे. घाटातील डोंगरावर उभ्या केलेल्या भव्य विठुरायाच्या मूर्तीकडे पाहून वैष्णवांच्या आनंदाला उधाण आले. घाट माथ्यावर हजारो भाविकांनी पालखी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

भाग गेला शीण गेला,

अवघा झाला आनंद ॥ सात किलोमीटरचा दिवे घाट पार करून अश्वांसह माउलींचा सोहळा सायंकाळी पाच वाजता झेंडेवाडी येथे पोहोचला. या वेळी पुरंदर तालुक्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करताना सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, विजय कोलते, बाबाराजे जाधवराव, जि.प सदस्य दिलीप यादव यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. रात्री साडेआठ वाजता पालखी तळावर समाज आरती झाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sant tukaram palkhi arrival in saswad for a two day zws

Next Story
२०२६-२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना  एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तकांचे वितरण
फोटो गॅलरी