लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर झालेली पोटनिवडणूक विविध कारणांनी गाजली. या निवडणुकीत वापरण्यात आलेला ‘मतदान पॅटर्न’ आता देशभरात जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कसब्यातील पोटनिवडणुकीत ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना देण्यात आलेली मतदानाची सुविधा देशभरात लागू करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ८० पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल २६ लाख ७० हजार, तर शारीरिक विकलांग पाच लाख ९० हजार ३८२ नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाच दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव असणाऱ्या संबंधित नागरिकांना ‘१२-ड’ हा अर्ज घरोघरी जाऊन दिला जाणार आहे. हा अर्ज या नागरिकांकडून भरून घेतला जाणार आहे. अर्जात संबंधित नागरिकांना घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार, याबाबतची माहिती घेतली जाईल. या अर्जांवर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील.

आणखी वाचा-अमित ठाकरे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार? म्हणाले, “मला नगरसेवक..”

या नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यास उर्वरित मतदारांना विशेत: तरुणांना त्यातून प्रोत्साहन मिळेल. मात्र, ज्या मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांचे मतदान वाया जाऊ नये, म्हणून ही सुविधा सुरू केली आहे. घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.