बोलाफुलाची गाठ पडली म्हणा किंवा आणखी काही.. पण  ‘पठाण’वर बहिष्कारास्त्र चालले नाही हे स्वागतार्ह..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हातारी मेल्याचे दु:ख असण्यापेक्षा काळ सोकावता कामा नये, याची उठाठेव ठेवावी लागते. कुणीएक बॉलीवूडी नट आणि त्याचा तद्दन गल्लाभरू मसालेपट यांच्याशी ‘लोकसत्ता’ला काहीएक देणेघेणे असण्याचे कारण नाही. पण तथाकथित संस्कृतिरक्षक समाजमाध्यमी टोळय़ांचे ‘बॉयकॉटास्त्र’ निष्प्रभ करत सिनेप्रेक्षकांनी या अभिनेत्याची भूमिका असलेल्या ‘पठाण’ या सिनेमाला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अक्षरश: डोक्यावर घेतले हे उत्तम झाले. ‘पठाण’ चित्रपटातील कोणा एका गाण्यात नायिका दीपिका पदुकोण हिने घातलेल्या अर्धवस्त्राच्या रंगावरून काही अर्धवटांनी त्या चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी, आजच्या भाषेत ‘बॉयकॉट करण्या’साठी समाजमाध्यमांवरून जे रान माजवले, ते निव्वळ बाष्कळ बडबड या प्रकारात मोडणारे होते. त्याचा यथोचित समाचार ‘लोकसत्ता’ने ‘धर्मा तुझा रंग कसा?’ (१७ डिसेंबर) या संपादकीयात घेतला आहे. त्या सगळ्याचे नंतर दिसायचे ते रंग दिसलेच, पण त्याहीनंतर चित्रपट पाहू नका अशी आवाहने बाष्कळ ठरणे आवश्यकच.

 याचे कारण कोणताही चित्रपट हा चित्रपट म्हणून कसा आहे, हे ठरवण्याचे काम दोघांचे. एक म्हणजे समीक्षक मंडळी. आपापल्या वकुबानुसार ती ते मुख्य म्हणजे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो पाहून करत असतात. दुसरा घटक म्हणजे प्रेक्षक. समीक्षक मंडळी काय लिहितात याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नसते. त्यामुळे समीक्षकांनी वाखाणलेला एखादा चित्रपट पहिल्याच दिवशी धारातीर्थी कोसळू शकतो आणि त्यांनी नाके मुरडलेला एखादा चित्रपट प्रेक्षकांनी पहिल्याच खेळापासून डोक्यावर घेतलेला असतो. पण अलीकडच्या काळात म्हणजे विशेषत: सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे समाजमाध्यमी खूळ बोकाळले. अर्थात त्याला खूळ म्हणून सोडून देण्याइतके ते निरुपद्रवी नाही आणि त्याचा बोलविता धनी कोण आहे आणि त्याचे हेतू काय असू शकतात हे उघड गुपित आहे. या पार्श्वभूमीवर बॉयकॉटास्त्रानंतर आमिर खान निर्मित ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटाचे बारा कसे वाजले हेही अगदी अलीकडचेच उदाहरण. अर्थात पुन्हा तो चित्रपट कसा होता हा मुद्दा अलाहिदा. पण कुणीही उठावे, चार टाळक्यांच्या जोरावर चित्रपटातील एखाद्या मुद्दय़ावर आक्षेप घ्यावा आणि त्याविरोधात बहिष्काराची मोहीम चालवावी हे याआधीही घडले आहे. पण यापूर्वी त्याला भौगोलिक सीमा होत्या. आता समाजमाध्यमांमुळे त्या पुसल्या गेलेल्या असतानाच्या काळात हा सगळा वावदूकपणा अनाठायी सक्रियपणा ठरू शकतो. लोकशाही देशात विरोध करण्यासाठीचे लोकशाही मार्ग उपलब्ध असताना कुणी तरी उठावे आणि सवंग प्रसिद्धीसाठी भावना दुखावल्याची बतावणी करावी हे अनाठायी आहे. ते मोडून काढले जायला हवेच होते, कारण तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखणार असाल तरच तुमच्याही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखली जाईल हे उघड आहे.

त्याहीपुढे जाऊन सांगायचे तर चित्रपटनिर्मिती हा एक उद्योग आहे. त्याच्या निर्मितीच्या सुरुवातीपासून ते प्रदर्शनापर्यंत हजारो लोकांचे पोट त्यावर अवलंबून आहे. पडद्यावर दिसणाऱ्या दोन-पाच कलाकारांच्या किती तरी पट माणसे या सगळय़ा प्रक्रियेत गुंतलेली असतात. कोटय़वधी रुपयांची उलाढाल एकेका चित्रपटातून होत असते. संबंधित चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्याचा काय तो न्याय करायचा खरा अधिकार चित्रपट रसिकांना असतो. कारण बॉलीवूड आदींचा सगळा खटाटोप त्यांना चित्रपट आवडावा आणि त्यांनी खिशामधला पैसा खर्च करून चित्रपटगृहात येऊन तो बघावा यासाठी असतो. त्यामुळे एकाच्या उद्योगातून दुसऱ्याचे मनोरंजन हेच त्याचे दोन मुख्य पैलू. ते जात, धर्म, िलग, भाषा, श्रीमंती-गरिबी, गाव-शहर या सगळय़ा भेदांच्या पलीकडचे आहेत; त्यामुळेच कमालीचे सांस्कृतिक वैविध्य असलेल्या या देशातील लोकांची मने सांधण्यासाठी बॉलीवूडचे चित्रपट हा कायमच उत्तम दुवा ठरला आहे.

हा धागा विस्कटू पाहणाऱ्यांना ‘आम्ही बदनामी, दहशत, बहिष्कार, द्वेष यांना भीक घालत नाही’ हे सिनेप्रेक्षकांनी दिलेले उत्तर ही खरी ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. आणि म्हणून ते महत्त्वाचे आहे. अर्थात या सगळय़ाच गोष्टी सरळसोट घडल्या असतील असे समजण्याइतके इथे कुणीच बालिश नाही. भाजपच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपसुद्धा सर्वसमावेशक व्हावा असे सूतोवाच करतानाच, ‘काही लोक एखाद्या चित्रपटावर विनाकारण भाष्य करतात आणि मग टीव्ही तसेच माध्यमांना दिवसभर विषय मिळतो. त्या लोकांनी तसे करू नये’ असे विधान केले होते. ते कुणासाठी होते आणि मुख्य म्हणजे का होते, ते सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. त्यामुळेच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आता ‘पठाण’ला विरोध करण्याचे काही कारण नाही. ‘ज्या गोष्टींना आमचा विरोध होता, त्या गोष्टी बदललेल्या आहेत. त्याउपरही कुणी विरोध केला तर त्याला आम्ही समजावून सांगू,’ असे म्हणत आपली बाजू सावरून घेतली. ‘कोण शाहरूख खान? मी ओळखत नाही’ असे म्हणणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनाही कायदा-सुव्यवस्था पाळली जाणार असल्याचे आश्वासन शाहरूख खान यांना दूरध्वनीवर द्यावे लागण्याच्या वृत्तांस प्रसिद्धी मिळाली. 

याला काहीशी पार्श्वभूमी आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांच्या घेतलेल्या भेटीगाठींची. उत्तर प्रदेशात ‘बॉलीवूड’ वसवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळींनी त्यांना सांगितले की बॉलीवूड म्हणजे फक्त अमली पदार्थ, गुन्हेगारी एवढेच नाही, तर त्यापलीकडे बरेच काही आहे. त्यातील संगीत जगभर पोहोचते. हे चित्रपट जगातले भारताचे संस्कृतिदूत ठरतात. त्यामुळे बॉयकॉट हा ट्रेण्ड रोखण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही पंतप्रधानांशी बोला अशी विनंती चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांनी योगी आदित्यनाथ यांना केली होती असे सांगितले जाते. यानंतर पंतप्रधान मोदीही जाहीरपणे बोलले, यात बोलाफुलाची गाठ पडली म्हणा किंवा आणखी काही.. पण ‘पठाण’वर बहिष्कारास्त्र चालले नाही हे खरे.

आता थोडे चित्रपटाविषयी. नेहमीप्रमाणे त्याविषयी दोन टोकांची मते मांडली जाताना दिसत आहेत. तो तांत्रिकदृष्टय़ा उत्तम असला, अभिनयाच्या पातळीवर चांगला असला तरी तद्दन गल्लाभरू आहे, हे मत बहुतेक सगळय़ाच समीक्षकांनी नोंदवले आहे. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या चित्रपट पाहायची सवय लागलेल्या लोकांना तो घराबाहेर काढतो आहे, चार पैसे खर्च करायला लावतो आहे, हे अधिक महत्त्वाचे. करोनापश्चात बॉलीवूड संपले, शाहरूख खान, सलमान खान यांची सद्दी संपली असे मानणाऱ्यांना ते उत्तर आहेच; पण मध्यमवर्गातून येऊन बॉलीवूडचा तारा ठरणाऱ्या शाहरूख खानची गेल्या दोनेक वर्षांच्या पडत्या काळातल्या अनुभवांनंतरची संघर्षवृत्ती त्यातून उठून दिसते, तसेच आपण राष्ट्रवादी मुस्लीम आहोत, हे ठळकपणे सांगणेही उठून दिसते. ते त्याने कधीच लपवून ठेवले नसले तरी ‘पठाण’ने हे विधान अधिक स्पष्टपणे केले आहे आणि करायला हवे, त्या नेमक्या काळात केले आहे. अर्थात आतून त्याला कदाचित अनेक रंग, अनेक पदर असू शकतात. कदाचित ते कधी बाहेर येणारही नाहीत. पण या घडीला तरी द्वेषाच्या, बदनामीच्या रंगापेक्षा प्रेक्षकाच्या प्रेमाचा रंग अधिक गहिरा ठरला आहे. कोणत्याही तथाकथित ‘मोहिमे’पेक्षा प्रेक्षक हाच राजा ठरला आहे. त्याने घडवलेल्या त्याच्या नायकावरचे प्रेम हेच हिरो ठरले आहे. हाच बॉलीवूडचा खरा रंग आहे.

More Stories onपठाणPathaan
मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on boycott effect on pathaan movie boycott pathaan trend zws
First published on: 28-01-2023 at 04:24 IST