अनुराधा मोहनी

मराठीचे थोर कवि व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी एका भाषणात असे विधान केले की “आज मराठीला जरी आपण राजभाषा म्हणून स्थान दिले असले तरी तिला योग्य तो सन्मान दिलेला नाही. डोक्यावर रत्नजडित मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी बसलेली आहे.” कुसुमाग्रजांचे हे विधान बरेच गाजले. त्यातून राजभाषा म्हणून मराठीच्या स्थानाचा मुद्दा प्रथमच ऐरणीवर आला. या प्रसंगाच्या दोन वर्षे आधी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असल्यामुळेही त्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले. कुसुमाग्रज जरी प्रथम कवि व नंतर ललित लेखक म्हणून प्रसिद्ध होते, तरी त्यांनी साहित्येतर भाषेचाही विचार केला आणि तिच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या पश्चात् २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

एखादी भाषा म्हणजे तीमधील साहित्य असा समज रूढ झाल्याचे आज आपल्याला दिसते. साहित्य हे भाषेचे महत्त्वाचे अंग आहे. त्यातून समाजाला आरसा दाखवण्याचे काम प्रतिभावंत कवी व साहित्यिक करीत असतात. ते थोर कार्य आहे. काव्याच्या आस्वादातून मिळणारा आनंद हा ‘ब्रह्मानंदसहोदर’ म्हणजेच ब्रह्मानंदाच्या तोडीचा आहे असे एक संस्कृत वचन आहे. परंतु हे सारे , भाषेतील इतर व्यवहार सुरळीत चालू असतील तेव्हाच अधिक खरे! प्रथम ती त्या प्रदेशाची मातृभाषा म्हणून, त्यानंतर शिक्षणाची, ज्ञानाची भाषा म्हणून आणि त्यानंतर प्रशासनिक व न्यायव्यवहाराची भाषा म्हणून वापरली जात असते तेव्हा. तशी असली तरच तो समाज स्वभाषक (स्वतःची भाषा असलेला), स्वशासित (लोकशाहीने विनियमित झालेला) आणि सुसंस्कृत (भाषा हे संस्कृतीचे शरीर आहे) मानला जाईल आणि त्याच्या भाषेतील साहित्य माधुर्य, ओज आणि प्रसाद या गुणांनी युक्त असेल. आज आपण साहित्य- संस्कृतीची ही पूर्वअट विसरलो आहोत. याचा परिणाम म्हणूनच की काय, आपले साहित्यही सम्मेलने, पुरस्कार, गटबाजी, शासनशरणता यांमध्ये अडकून निष्प्रभ झाले आहे. साहित्याच्या पुरस्कारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी त्यांची प्रतिष्ठा मात्र कमी होत चाललेली आहे.

हेही वाचा >>>मराठी बालसाहित्य मुलांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न का होत नाहीत?

साहित्येतर भाषेची व्याप्ती खूप मोठी आहे. सगळे मराठी भाषक साहित्याचे आस्वादक नसतात. काही तर निरक्षरही असू शकतात. परंतु त्यांची मातृभाषा मराठी असते. ते मराठीतून इतरांशी व त्यापेक्षा अधिक स्वतःशी बोलत असतात. भाषेतून विचार करतात. आपल्या भावना स्वतःजवळ व्यक्त करतात व नकारात्मक भावनांना आवरही घालतात. आपल्या प्रेमपात्राशी प्रेमसंवाद करतात.

मातृभाषा म्हणजे आईची किंवा वडिलांची भाषा नव्हे. आपला जन्म होतो त्या परिसराची जी भाषा सर्वप्रथम आपल्या कानावर पडते, ती आपली मातृभाषा बनते. कारण त्याच भाषेतील ध्वनी ऐकून, त्यातून कोणता आशय संक्रमित होत आहे, ते आजूबाजूला पाहून आपण शिकतो. मग जो आशय आपल्याला व्यक्त करायचा आहे, त्यासाठी नेमून दिलेले ध्वनी आपल्या स्वरयंत्रातून काढण्याचा प्रयत्न करतो. भाषा ही मानवनिर्मित गोष्ट असल्यामुळे कष्टसाध्य आहे. परंतु घरातील वातावरण जेवढे अनुकूल म्हणजे स्नेहपूर्ण असेल, वेगवेगळ्या शब्द-वाक्प्रयोगांनी परिपूर्ण भाषा बालकाला ऐकायला मिळत असेल, त्याच्याशी जेवढ्या विभिन्न वयांचे लोक विभिन्न शैलींमध्ये बोलत असतील, त्या भाषेची जेवढी निश्चित धाटणी असेल, तिचे व्याकरण जेवढे सुस्पष्ट व तर्कसंगत असेल, तेवढी ती शिकणे बालकाला सोपे होते. आपण तिला मातृभाषा म्हणतो कारण आईजवळ असताना आपण जसे सुखी, निश्चिंत असतो, तसेच मातृभाषा बोलताना व ऐकताना असतो. त्या भाषेतून विचार करताना आणि मांडताना आपल्याला सुरक्षित वाटत असते.

आपण भाषा शिकताना तिच्यातील कौशल्ये आत्मसात करतो. ऐकणे, बोलणे, वाचणे व लिहिणे ही चार प्राथमिक भाषाकौशल्ये आहेत. मराठी येणाऱ्याला मराठी ऐकता येते, समजून घेता येते. जर दुसऱ्याचे म्हणणे ऐकू आले नाही वा समजले नाही, त्यानंतर स्वतःचे म्हणणे मांडता आले नाही, तर संवादाची प्रक्रिया अपुरी राहून प्रकरण हातघाईवर येऊ शकते. अशा प्रसंगातून हिंसा जन्म घेते. हिंसा टाळण्यासाठी भाषा येणे अत्यावश्यक आहे. नेमका विचार करून शांततेने, चिकाटीने संवाद साधणारा माणूस सहसा हिंसा करणार नाही वा तिला बळी पडणार नाही. म्हणून संवाद आणि अहिंसा टिकवून ठेवणे हे मातृभाषेचे महत्त्वाचे कार्य आहे.

हेही वाचा >>>स्वयंसेवीक्षेत्राला पाठबळ देणारा ‘देणे समाजाचे’ उपक्रम!

गणित आणि इंग्रजीची भीती…

संवादानंतर शिक्षणाचे माध्यम म्हणूनही मातृभाषा तेवढीच आवश्यक आहे. शिक्षण घेताना मूर्ताकडून अमूर्ताकडे जाण्याचा प्रवास भाषेचेच बोट धरून करायचा असतो. पण मराठी माध्यमातून शिक्षण घेणे आज तुच्छ व अप्रतिष्ठेचे मानले जात आहे. त्याचा परिणाम काय होत आहे ते बघू. आज इंग्रजी व गणित या दोन विषयांत नापास होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इंग्रजी ही एक भाषा आहे. कोणतीही भाषा शिकणे तसे कठीण नाही, परंतु आधी मातृभाषा चांगल्या रीतीने अवगत झाली तरच दुसरी शिकता येते. (इंग्रजीला स्मार्ट किंवा जागतिक भाषा कितीही म्हटले, तरी ती परकी आहे आणि भारतीय समाजात अनिवार्य नाही.) दुसरा विषय गणित. आज गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून न शकता मराठीतून शिकणे म्हणजे अशिक्षित राहणे असेच समजले जाते. वास्तविक गणित म्हणजे काही निव्वळ आकडेमोड नव्हे, तर विशिष्ट प्रयोजनासाठी केल्या जाणाऱ्या विशिष्ट तार्किक प्रक्रिया. प्रयोजन कोणते ते तर भाषेमधूनच समजून घ्यावे लागते. त्यामुळे भाषा न समजणाऱ्याला गणित करता येत नाही. आपल्याकडील भाजीवाले, छोटे दुकानदार हे अल्पशिक्षित असूनही त्यांच्या हिशेबात कधी चुकत नाहीत. लोहार, सुतार, गवंडी, शिल्पकार हे तर लांबी- रुंदी- उंची ह्या तीन मितींमध्ये काम करतात. चौथी मिती म्हणजे काळ. तर काळ- काम- वेगाचा हिशेबही ते अचूकपणे ठेवतात. अशिक्षित महिला घरी स्वयंपाक करताना त्याचे गणित बरोबर साध्य करतात. परंतु त्यांची मुले मात्र दहावीत, नववीत, कधी तर त्याही खालच्या वर्गात गणितात अनुत्तीर्ण होतात. (कधीकधी हे स्त्रीपुरुष कारागीर स्वतःही शाळेत गणितात नापास झालेले असतात) याचा अर्थ काय? तर गणिताचे प्रयोजन जीमधून जाणून घ्यायचे, ती भाषा त्यांना अपरिचित असते. आता विज्ञानाचा विचार करू. विज्ञानाला आज शालेय शिक्षणात ‘परिसर अभ्यास’ म्हणतात. परिसराचा अभ्यास करणे म्हणजे आपला परिसर आपल्या भाषेतून जाणून घेणे आणि त्याचे (आपल्या भाषेतून) जतन करणे. आपल्या परिसरातील ओढे-नाले व इतर जलस्रोत, झाडे-फुले-पाने-फळे व बीबियाणे, हवा-वारे-वावटळे-झंझावात, चंद्र-सूर्य-ग्रह-तारे, पशुपक्षी… हे सारे आपल्या भाषेतून जाणून घ्यावे लागतात. त्या भाषेत त्यांची विशिष्ट नावे असतात. कारण ज्या जमिनीतून हे सारे आले, तेथूनच ती भाषाही आलेली असते.

ह्या पार्श्वभूमीवर आज असे दिसते की मुलांना त्यांची स्वतःची भाषा, त्यांची मातृभाषा येत नसल्यामुळे ते नवीन भाषा शिकू शकत नाहीत. आपल्याच भाषेबद्दल न्यूनगंड असताना नवीन भाषेसंबंधीचा आत्मविश्वास आणणार कुठून? गणिताचेही तेच. परिसराची माहिती त्यांना दृश्याच्या, गंधाच्या, स्पर्शाच्या माध्यमातूनही जपायची असते. या स्मृती त्यांच्या भाषेशी निगडित असतात. वर्गात जाऊन जेव्हा ते त्यांच्या परिसराचा इंग्रजीतून अभ्यास (!) करतात, तेव्हा ते अध्ययन, न समजता ऐकलेले बरळणे होऊन जाते.

हेही वाचा >>>ज्ञानपीठ आणि कापूसकोंड्या 

इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणव्यवस्थेने मुलांना त्यांच्या आयुष्याशी अत्यंत असंबद्ध असलेल्या दुनियेत नेऊन ठेवलेले आहे. ज्यांचे आईबाप स्वतः उच्चशिक्षित असून मुलांचा अभ्यास घेतात किंवा त्यांना महागड्या शिकवण्या लावू शकतात असे पाचदहा टक्के सोडले तर लाखो- कोट्यवधी विद्यार्थी आज त्यामुळे शिक्षणव्यवस्थेमधून बाहेर, अज्ञान-दारिद्र्याच्या आणि न्यूनगंडाच्या खाईत फेकले जात आहेत. इंग्रजी येत नाही आणि आपली भाषा बोलण्याची सोय नाही अशा भाषाहीन अवस्थेत जगणारी ही मुले हिंसा व गुन्हेगारीच्या चक्रात अडकली तर त्यात काय नवल? वर म्हटलेले पाचदहा टक्केही दहावी- बारावी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण वगैरे घेतात, नावापुढे मोठ्या झोकात पदव्या लावतात. पण इंग्रजीतून विचार करून नवीन ज्ञानाची रचना करणे त्यांना शक्य होत नाही. मिळालेल्या माहितीचे प्रत्यक्षात उपयोजन केल्यानंतर त्याचे ज्ञानात रूपांतर होते. मेंदूची प्रक्रिया झाली नाही तर ती निव्वळ माहितीच राहते. लहानपणापासून न समजता अभ्यास करण्याची, घोकंपट्टी आणि पोपटपंची करण्याची सवय लागलेलीच असते. घोकण्यासाठी त्यांना तयार उत्तरे पुरवली जातात. अशी तयार उत्तरे पुरवणारा खूप मोठा समांतर शिक्षण (!) व्यवसाय आज आपल्या समाजात फोफावला आहे. या सगळ्याचा परिणाम मेंदूच्या निष्क्रियतेत, आपल्या प्रश्नांवर उत्तरे न शोधू शकण्यात, नातेसंबंध न जपण्यात आणि आयुष्यातील स्वारस्य गमावून प्रचंड हताशा येण्यात होत आहे.

हे परिणाम जाणून स्वतःची भाषा विकसित करणे हे आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचे मर्म आहे. तेव्हा आता आपण निदान स्वतःशी व घरीदारी मराठी बोलण्याचा, चांगले मराठी प्रयत्नपूर्वक ऐकण्याचा, आपल्या मित्रमैत्रिणींना, प्रेमिक- प्रेमिकांना मराठीतून पत्र लिहिण्याचा संकल्प करू या का?

anumohoni@gmail.com