सुबिलमल भट्टाचारजी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून समाजमाध्यमांच्या विश्वात एक खास परिवर्तन दिसू लागले आहे. बहुसंख्य नेटिझन्स ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हे आजवर प्रचंड लोकप्रिय असलेले समाजमाध्यम सोडून त्याऐवजी ‘थ्रेड्स’ आणि ‘ब्लूस्काय’सारख्या पर्यायांकडे वळू लागले आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३ कोटी ५० लाख नवीन युझर्स थ्रेड्स वापरू लागले असून त्यामुळे या माध्यमावरील एकूण युझर्सची संख्या २७ कोटी ५० लाखांच्या घरात गेली. तर ब्लूस्कायच्या एकूण युझर्सची संख्या सुमारे दोन कोटी दोन लाखांच्या घरात आहे. अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात ५०० टक्के वाढ झाली. अर्थात ब्लूस्कायच्या युझर्सची संख्या आजही थ्रेड्सच्या युझर्सपेक्षा कमीच आहे, मात्र त्यात झालेली वाढ लक्षणीय आहे.

एक्सच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे या पूर्वीचे प्रयत्न फसले. भारतातीली त्याचे बोलके उदाहरण म्हणजे ‘कू’ या ॲपला आलेले अपयश. मात्र आता सुरू असलेल्या युझर्सच्या स्थालांतराला एक विशिष्ट वेग आहे. युझर्सचा अपेक्षाभंग, नव्या तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि प्रतिस्पर्धी माध्यमांनी साधलेली वेळ, यामुळे हा वेग प्राप्त झाला आहे. सध्या जी चिंता व्यक्त केली जात आहे, तिला मुख्यत्वे अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले वातावरण आणि इलॉन मस्क यांनी स्वत:ची निर्माण केलेली आक्रमक राजकीय प्रतिमा ही कारणे आहेत. विशिष्ट विचारसरणीकडे एक्स अधिक टीकात्म पद्धतीने पाहू लागले आहे. इलॉन मस्क एकीकडे एक्स हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचा दावा करतात, मात्र दुसरीकडे त्यांना स्वत:वरील टीका मात्र अजिबातच सहन होत नसल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक असल्याचे युझर्सचे मत होऊ लागले आहे.

हेही वाचा…चिनी असंतोषाच्या झळा जिनपिंगपर्यंत?

इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यापासून त्यात मनमानीपणे करण्यात आलेल्या बदलांविषयी, तांत्रिक अस्थिरतेविषयी आणि आशय नियमनासंदर्भातील सतत बदलणाऱ्या दृष्टिकोनाविषयी युझर्समध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्या मूळ युझर्समध्ये या माध्यमाविषयी अविश्वास वाढू लागला आहे. पत्रकार, अभ्यासक आणि क्रिएटर्स हे ट्विटरचा कणा होते, मात्र आता त्यांना हे माध्यम बेभरवशाचे वाटू लागले आहे. व्हेरिफिकेशनच्या चिन्हासंदर्भातील नियमांत करण्यात आलेले बदल आणि ट्विटरचे एक्स या नावाने करण्यात आलेले रिब्रँडिंग याचा लाभ होण्याऐवजी तोटाच झाला आहे. युझर्स नवे पर्याय शोधू लागले आहेत.

सध्या सुरू असलेले माध्यमांतर आधीच्या प्रयत्नांपेक्षा अधिक आशादायक वाटण्यामागे काही कारणे आहेत. साधलेली वेळ हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘मेटा’ने ‘इन्स्टाग्राम’चा विस्तृत युझरबेस घेऊन थ्रेड्स लाँच केले होते. ‘मॅस्टोडॉन’सारखे ट्विटरचे यापूर्वीचे स्पर्धक अपयशी ठरण्यामागे असा आयता युझरबेस नसणे, हे महत्त्वाचे कारण होते. थ्रेड्स लाँच झाले तेव्हा मोठ्या संख्येन युझर्स त्याच्याशी जोडले गेले, मात्र हा वेग हळूहळू थंडावला. परंतु मेटाने संयम बाळगून वाटचाल सुरू ठेवली. हळूहळू नवी फिचर्स देण्यास सुरुवात करण्यात आली. हे पाहता मेटाने ताबडतोब वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नव्हे, तर मोठी खेळी खेळण्यासाठी थ्रेड्सला मैदानात उतरवल्याचे स्पष्ट झाले.

ब्लूस्कायची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या विकेंद्रीत प्रोटोकॉलमुळे विविध समाजमाध्यमे परस्परांशी ज्याप्रकारे संवाद साधतात, त्या पद्धतीत क्रांती घडू शकते. विदेची सुरक्षितता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या व एक्सशी अगदी सुरुवातीपासून जोडलेल्या तंत्रस्नेही व्यक्तींना हे नवे माध्यम आकर्षित करू शकते. ब्लूस्काय आता सामान्य युझर्समध्येही लोकप्रिय होऊ लागले आहे.अर्थात केवळ तांत्रिकत वैशिष्ट्यांच्या जोरावर यशाची खात्री बाळगता येत नाही. ‘ॲप.नेट’ आणि ‘एल्लो’ सारख्या ट्विटरच्या याधीच्या स्पर्धकांकडे अधिक आधुनिक तंत्रज्ञान होते, तरीही त्यांना फारसे यश आले नाही.

आता जी माध्यमांतराची लाट आली आहे, त्याला मानसिकतेतील बदलही कारणीभूत आहे. आज युझर्स एकाच समाजमाध्यमाऐवजी विविध समाजमाध्यमांचा वापर करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. या बहुमाध्यमस्नेही मानसिकतेमुळे समाजमाध्यमांवरील वर्तनात मूलभूत बदल दिसू लागले आहेत. लोक विविध सामाजिक वर्तुळांसाठी विविध ॲप वापरू लागले आहेत. प्रत्येक माध्यमाची स्वत:ची खासियत असते आणि ती युझर्सना आकर्षित करू लागली आहे. थ्रेड्स कदाचित सहजसंवाद आणि दृश्याधारित आशयाच्या क्षेत्रात भरारी घेऊ शकेल, तर ब्लूस्काय तंत्रविषयक चर्चा आणि डिजिटल हक्कांविषयी जागरुकता निर्माण करणारे व्यासपीठ ठरू शकले. अशी खासियत जपल्यामुळे कोणत्याही एकाच माध्यमावर ट्विटरचा परिपूर्ण पर्याय ठरण्याचा भार येणार नाही.

हेही वाचा…भारतीय नौदलातील स्त्रीशक्ती…

अर्थात या माध्यमांतराची अनेक आव्हानेही आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ट्विटरचे सामर्थ्य कोणतेही वृत्त घडल्याक्षणी तातडीने मिळवून देण्याच्या आणि त्यावर सामान्यांना आपले मत व विश्लेषण मांडण्याची संधी देण्याच्या क्षमतेत दडलेले होते. थ्रेड आणि ब्लूस्कायपैकी कोणालाही अद्याप ही क्षमता पूर्णपणे प्राप्त करता आलेली नाही. याव्यतिरिक्त ट्विटरककडे ऐतिहासिक संवादसाखळ्यांचा प्रचंड मोठा साठा (अर्काइव्ह) आहे. अनेक थर्डपार्टी सेवांनी त्याचे संकलन केले आहे. त्यामुळे ट्विटर सोडून जाणाऱ्या युझर्सना विदाउपलब्धतेची मोठी किंमत मोजावी लागेल.

आर्थिकदृष्ट्या तग धरणे हे आणखी एक आव्हान ठरू शकते. एक्सला ज्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला त्यांचे उत्तम दस्तावेजीकरण झाले आहे. या नव्या समाजमाध्यमांनाही याच सर्व आव्हानांतून मार्ग काढत पुढे जावे लागणार आहे. थ्रेड्सला मेटाच्या उत्पन्न स्रोतांचा आधार आहे, मात्र ब्लूस्कायच्या विकेंद्रीत मॉडेलला त्याचे स्वतंत्र अस्तित कायम ठेवण्यासाठी आधाराची गरज भासणार आहे.

या स्थलांतराच्या यशाचे सर्वांत आश्वासक लक्षण म्हणजे युझर्सच्या अपेक्षांमधील बदल. पूर्वी अशाप्रकारचे जे प्रयोग झाले, त्यात एक्सची तंतोतंत प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र आता वापरकर्ते विविध समाजमाध्यमांच्या खास वैशिष्ट्यांचा अधिक सहजतेने स्वीकार करताना दिसतात. ही लवचिकता नवीन समाजमाध्यमांना प्रयोगशीलतेसाठी आणि नवनिर्मितीसाठी आवश्यक अवकाश देते.

भविष्यात समाजमाध्यमांच्या विश्वात एक्सचा केवळ एकच एक पर्याय असण्याऐवजी वेगवेगळ्या गरजा भागविणाऱ्या आणि विविध समुदायांना सेवा देणाऱ्या पर्यायांची मांदियाळीच दिसेल. अशा विभागणीचा सुपरिणाम असा की त्यामुळे कदाचित एकाच माध्यमाचे जागतिक स्तरावरील संभाषणप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य संपुष्टात येईल. अधिक वैविध्यपूर्ण आणि एकमेकांशी जोडली गेलेली व्यवस्था उदयास येईल. थ्रेड्स, ब्लूस्काय किंवा अद्याप फारसे ज्ञात नसलेली समाजमाध्यमे यशस्वी होवोत वा न होवोत, एक्सचे केंद्रीभूत समाजमाध्यम मॉडेलविरोधातील चळवळ मात्र कायम सुरू राहील, असे दिसते.

हेही वाचा…‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ पाळला गेलाच पाहिजे…

यास्वरूपाच्या याआधीच्या प्रयत्नांपेक्षा आताचा प्रयत्न वेगळा ठरतो, तो हे पर्याय अधिक उत्तम आहेत, म्हणून नव्हे, तर यावेळी युझर्सच्या अपेक्षांत आणि वर्तनात बदल होऊ लागले आहेत. प्रश्न हा नाही की युझर्स एक्सला सोडचिठ्ठी देतील का? प्रश्न हा आहे, की ते या विकेंद्रित समाजमाध्यमांच्या प्रतलावर कशाप्रकारे भूमिका बजावतील? या पार्श्वभूमीवर सध्याचे माध्यमांतर केवळ एका पर्यायाकडून दुसऱ्याकडे जाणे राहणार नाही. तो आपल्या परस्परांशी जोडले जाण्याच्या आणि संवाद साधण्याच्या प्रक्रियेतील उत्क्रांतीचा एक टप्पा ठरू शकतो. (लेखक संरक्षण आणि सायबर सुरक्षा विश्लेषक तसेच जनरल डायनॅमिक्सचे भारतातील प्रमुख आहेत.)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most of netizens left popular social media platform x for alternatives like threads and bluesky sud 02