कल्याण – कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागातील एका इमारत बांधकामावर काम करणाऱ्या मजुराने स्वत:वर धारदार चाकूने वार करून स्वत:चे जीवन संपविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. रविवारी हा प्रकार घडला आहे. मानसिक तणावातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलीस आणि मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

आमसी रंगू राय (४०) असे मयत मजुराचे नाव आहे. राय कुटुंब मुळचे झारखंड राज्यातील आहे. मजुरीसाठी ते कल्याणमध्ये आले आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांंनी सांंगितले, आमसी रंगू राय हे कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील छत्री बंगल्याजवळील पाण्याच्या टाकीजवळील आर. बी. कन्स्ट्रक्शन ओम पुष्पांंजली इमारत येथे काम करत होते. त्यांच्या सोबत इतरही मजूर अनेक दिवसांपासून काम करत होते. परंतु, शनिवारी दुपारी आमसी रंंगू राय यांंनी काही कळण्याच्या आत आपल्या राहुटीत असलेल्या निवासस्थानातून चाकू आणला. इतर मजुरांना काही कळण्याच्या आत स्वताच्या गळ्यावर धारधार चाकूने वार करून स्वत:ला गंभीर जखमी केले.

हेही वाचा – डोंबिवलीत बेकायदा चाळींवर कारवाई

हेही वाचा – पोलीस दलातील ८०५ जागांसाठी ४६ हजाराहून अधिक अर्ज

या इमारतीवर काम करणाऱ्या इतर मजुरांनी आमसी राय यांना तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले. पण डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आमसी राय अनेक दिवस मानसिक तणावाखाली होते. या कारणातून त्यांनी ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून काढला आहे. आमसी राय यांच्या अल्पवयीन मुलाने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.