बदलापूरः मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बदलापुरात आलेल्या एका २२ वर्षीय तरूणीला तिच्याच मैत्रिणीने गुंगीचे औषध दिले तर दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पिडीत तरूणीची बदलापूर पूर्वेत राहणाऱ्या भूमिका मेश्राम या तरूणीशी ओळख झाली होती. तीन दिवसांपूर्वी भूमिकाने आपल्या मैत्रिणीला वाढदिवसासाठी घरी बोलावले होते. त्याचवेळी तिच्या दोन मैत्रांनाही वाढदिवसासाठी पाचारण केले होते. रात्रभर पार्टी केल्यानंतर भूमिकाने तरूणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकल्याचा आरोप आहे. त्यांतर बेशुद्धावस्थेत असलेल्या तरूणीवर तिथे असलेल्या दोन मित्रांनी बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी तरूणी घरी न परतल्याने पालकांनी भूमिका या तरूणीला संपर्क केला असता तुमची मुलगी मद्यप्राशन करून घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकांनी तरूणीना घरी आणले. शुद्ध आल्यानंतर तरूणीला आपल्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले.

हेही वाचा : टिटवाळ्याजवळ वीटभट्टी मजूर महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार  

त्यानंतर पालकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर याप्रकरणी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत तरूणीवर बलात्कार झाल्याचे दिसून आल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भूमिका मेश्राम, सातारा येथून आलेला शिवम राजे आणि संतोष रूपवते या तिघांना अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांनी दिली आहे.