डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह तीन जणांना एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाने रागाच्या भरात मारहाण, शिवीगाळ करत चावे घेतल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील चावे घेतलेल्या जखमींवर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी आणि उपचार करून या अहवालाप्रमाणे मानपाडा पोलिसांनी महिला रुग्णाचा पती आणि तिच्या सासू विरुध्द शनिवारी गुन्हा दाखल केला.

आरोग्यम रुग्णालयातील डाॅ. नितीन गजानन खोटे (३८, रा. बदलापूर), कर्मचारी इम्तियाज मुल्ला, डाॅ. संदीप यादव असे चाव्यामुळे जखमी झालेल्या आरोग्यम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात महिला रुग्ण ज्योती सिंंग हिचा पती राज सूर्यप्रकाश सिंंग, राज यांची सासू शशिकला सिंग (ज्योतीची आई) यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपी सागाव येथील खालचा पाडा भागात राहतात, असे पोलिसांनी सांंगितले.

हेही वाचा : “दाढी वाढवली म्हणजे, कोणी दिघे साहेब होत नाही”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची टीका

पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता डाॅ. नितीन खोटे कर्तव्यावर होते. यावेळी ज्योती सिंंग आणि तिची आई शशिकला सिंंग हे रुग्णालयात उपचारासाठी आले. ज्योती यांंच्या पोटात दुखत होते. वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय गुप्ता यांचा सल्ला घेऊन डाॅ. खोटे यांनी ज्योती यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे दाखल होऊन डाॅक्टरांनी त्यांना इंंजेक्शन दिले. थोड्या वेळाने त्यांना बरे वाटू लागले. त्यामुळे डाॅक्टरांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला.

घरी जाताना पुन्हा ज्योती यांच्या पोटात दुखू लागले. त्या पुन्हा रुग्णालयात आल्या. त्यांना डाॅ. खोटे यांनी पुन्हा इंंजेक्शन दिले. यावेळी पाठोपाठ ज्योतीचा पती राज सूर्यप्रकाश सिंंगे हे रुग्णालयात आले. त्यांनी डाॅ. नितीन खोटे यांना रागाने माझ्या पतीला काय झाले आहे. तुम्ही आतापर्यंत काय उपचार केले आहेत, तुमची वैद्यकीय पदवी काय आहे, असे प्रश्न ओरडून करू लागले.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली

डाॅ. खोटे यांंनी ज्योती यांच्या पोटाचे सिटीस्कॅन केले की आपल्याला निदान करून त्याप्रमाणे उपचार करता येतील असे सांगितले. यासाठी किडणीचे पहिले सिटीस्कॅन करावे लागेल असे डाॅ. खोटे यांनी आरोपी राज सिंंग यांंना सांंगितले. राज यांनी आता हे काही करायची गरज नाही. तुम्ही काहीही सांगू नका. मी तुम्हाला बघतो, असे बोलून राज यांनी डाॅ. खोटे यांना मारहाण करून त्यांना जोराचा धक्का देऊन जमिनीवर पाडले. डाॅ. खोटे राज यांना समजून सांगत होते,

राज यांच्या आक्रमकपणाने रुग्णालयात गोंधळ उडाला. राज यांनी डाॅ. खोटे यांच्या हाताच्या कोपराजवळ दाताने जोराने चावा घेतला. डाॅ. खोटे यांना साहाय्य करण्यासाठी पुढे आलेल्या डाॅ. संदीप यादव, इम्तियाझ मुल्ला यांनाही राज यांनी जोराने चावा घेऊन त्यांना जखमी केले. आरोपी शशिकला यांनी कर्मचारी उषा दुर्गेश यांना शिवीगाळ केली.

हेही वाचा : कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम

राज आणि शशिकला सिंग यांंनी डाॅक्टर कर्मचाऱ्यांंना अनावश्यक मारहाण केली म्हणून डाॅ.खोटे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. वैद्यकीय संंघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.