कल्याण: कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांबा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई मधील एक प्रवासी आणि त्याचे दोन मित्र वाशी बसमध्ये चढत होते. यावेळी तीन भामट्यांनी बसमध्ये चढत असताना हुल्लडबाजी करून एका प्रवाशा बरोबर वाद घालून त्याच्या जवळील १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले. आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण पश्चिमेतील बस आगारात प्रवाशांजवळील वस्तू चोरणे, आगारा बाहेरील प्रवाशांच्या हातामधील वस्तू लुटून नेण्याचे प्रकार घडत होते. हे प्रकार आता वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावर सुरू झाल्याने प्रवाशांनी विशेषता महिला प्रवाशांनी धसका घेतला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हेही वाचा : कल्याणमधील शहाड, रामबाग परिसराचा पाणी पुरवठा रात्रीपासून बंद पोलिसांनी सांगितले, हेतराज प्रजापती (२२) हे कल्याणमध्ये नोकरी करतात. ते नवी मुंबईतील सानपाडा भागात राहतात. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार हेतराज आणि त्यांचे दोन साथीदार वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावरील नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढत असताना तीन भामट्यांनी हेतराज यांच्याशी बसमध्ये चढताना धक्काबुक्की का केली, असे बोलत भांडण उकरून काढले. तिघे मिळून हेतराज यांना दमदाटी करू लागले. हेतराज त्यांना समंजसपणे सांगत असताना, ते दादागिरीची भाषा करत होते. हेही वाचा : Kalyan Crime News : “पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल..”; चिठ्ठी लिहित कल्याणच्या शाळकरी मुलाने आयुष्य संपवलं तिन्ही भामटे चोरी, प्रवाशाला लुटण्याच्या उद्देशाने बसमध्ये चढले होते. हेतराज यांच्याशी बाचाबाची केल्यानंतर एका भामट्याने हेतराज यांच्या हातामधील मोबाईल हिसकावला. तो परत देण्याची मागणी हेतराज करू लागले तेव्हा ते तिघे भामटे बसमधून उतरून पळून गेले. हेतराज यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार पी. एल. साळुंखे तपास करत आहेत.