लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: येथील पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ एका सात माळ्याच्या बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू करण्याचा भूमाफियांचा प्रयत्न पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. या इमारतीत निवासी आणि वाणिज्य वापर सुरू केला तर आपणावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिला आहे.

या इशाऱ्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावर नवापाडा भागात मारुती मंदिराच्या जवळ अमोल शाम कांबळे आणि भागीदारांनी एक सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीवर पालिकेने कारवाई करू नये म्हणून माफियांनी इमारतीचे काम चालू असताना या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर व्यायामशाळा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू केली होती. व्यायामाचे अवजड साहित्य या बेकायदा इमारतीत ठेवण्यात आल्यानंतर काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला होता.

हेही वाचा… Maharashtra SSC Result 2023: ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी, यंदा ९३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा निकाल

बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू झाली तर तरुणांच्या जीवाशी भूमाफिया खेळत असल्याचा प्रकार अनेक पालकांच्या निदर्शनास आला होता. या व्यायाम शाळेची जाहिरात करण्यात आली होती. काही जागरुकांनी यासंदर्भात पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांच्याकडे तक्रार केली. गुप्ते यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली तेव्हा त्यांना बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू करण्याचे आणि काही सदनिका विक्री करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केले असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा… रेल्वेमुळे बदलापुरकरांची कोंडी होण्याची भिती, शाळा सुरू होण्याच्या वेळीच भुयारी मार्ग दुरूस्तीसाठी महिनाभर बंद

साहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी या बेकायदा इमारतीत निवासी आणि वाणिज्य वापरास भूमाफियांना प्रतिबंध करणारी नोटीस बजावली आहे. नोटिसीमधील आदेशाचे उल्लंघन केले तर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा भूमाफिया अमोल शाम कांबळे यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६७ च्या नोटिसीव्दारे दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipality warns of criminal action to those who attempt to start exercise school in illegal building in dombivli dvr
First published on: 02-06-2023 at 15:14 IST