बदलापूरः बदलापूर शहरातील पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी उड्डाणपुलाइतकाच महत्वाचा असलेल्या भुयारी मार्गाच्या दुरूस्तीकामासाठी उशिराने जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने हा मार्ग संपूर्ण जून महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील पूर्ण वाहतूक व्यवस्था उड्डाणपूलावरून होणार असून १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयावरून आता संताप व्यक्त होतो आहे. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता कामाच्या एक दिवस आधी रेल्वे प्रशासनाने घाईघाईत हा निर्णय जाहीर केला आहे.
बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतुकीसाठी शहरात एकमेव उड्डाणपूल असून बेलवली भागात दुसरा अरूंद आणि लहान वाहनांसाठी योग्य असा भुयारी मार्ग आहे. या मार्गात सातत्याने सांडपाणी जमा होत असते. पालिका, रेल्वे प्रशासन यावर अनेक वर्षात तोडगा काढू शकलेला नाही. पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाणी साचल्याने अनेक वाहनेही येथे अडकल्याचे समोर आले होते. त्यामुळे भुयारी मार्गाच साचणारे पाणी थांबवणे महत्वाचे आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होण्याची शक्यता असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळाही सुरू होणार आहेत. बदलापूर शहरातील बहुतांश शाळांच्या लहान आणि मोठी वाहने विद्यार्थ्यांना याच मार्गाने नेआण करत असतात. मात्र असे असताना १ जून रोजी सायंकाळी एक प्रसिद्धी पत्रक काढून बदलापुरच्या बेलवली भागातील भुयारी मार्ग २ जूनपासून ३० जूनपर्यंत भुयारी मार्गात येणारे पाणी रोखण्यासाठी आणि इतर आवश्यक दुरूस्तीसाठी दोन्ही दिशेने बंद करण्यात येईल असे जाहीर केले.
हेही वाचा >>> डोंबिवलीत वाढीव परतव्याचे आमीष दाखवून नोकरदाराची चार कोटीची फसवणूक
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने हे पत्र समाजमाध्यमांवर जाहीर करण्यात आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. येत्या १५ जुनपासून बदलापुरातील जवळपास सर्वच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग अशा शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सोपा आणि नजिकचा आहे. हा मार्गच बंद ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या वाहनांना आणि एकदंर शहरातील वाहतुकीला फटका बसेल अशी भीती व्यक्त होते आहे. रेल्वे प्रशासनाच्या या आततायी निर्णयावर आता शहरातून टिका होते आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये रेल्वे प्रशासन झोपले होते का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. याबाबत अंबरनाथ, बदलापूर स्कुल बस असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोसंदर यांना विचारले असता, ऐन पावसाळ्यात हाती घेतलेल्या या कामाचा वाहतुकीला फटका बसेल असे त्यांनी सांगितले. शाळा सुट्टी काळात हे काम करायला हवे होते. तसेच आताच्या कामाने कायमचा प्रश्न सुटणार असेल तर काम करावे असेही कोसंदर म्हणाले. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, बदलापुरच्या भल्यासाठी हे काम करत असून त्यांना नको असल्यास पत्र द्यावे आम्ही काम बंद करू असे उर्मट उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत सेवानिवृत्तांसाठी दर महिन्याला पेन्शन अदालत
पूर्वनियोजन आणि सूचना देण्याची विनंती
रेल्वे प्रशासनाने गुरूवारी सायंकाळी याबाबतची नोटीस देऊन शुक्रवारी भुयारी मार्ग बंद केला जाईल असे कळवले. अशा तातडीने मार्ग बंद केल्यास गोंधळ होईल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वनियोजन आणि काही दिवसांची सूचना देऊनच काम सुरू करावे अशी विनंती प्रशासनाला केली जाणार असल्याचे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.