ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साकेत पूल भागातील मुख्य मार्गिकेच्या रुंदीकरणास सुरूवात झाली आहे. साकेत पूल ते माजिवडा असे हे काम सुरू असून या कामास किमान तीन महिने लागण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दररोज सकाळी नवी मुंबई, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मुख्य मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकेवर आठ वाहिन्या वाहन चालकांना उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर साकेत पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. त्यामुळे काही महिने मुंबई नाशिक महामार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो वाहनांची वाहतूक होत असते. उरण जेएनपीटी आणि नाशिक येथून गुजरात किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही याच मार्गावरून वाहतूक करावी लागते. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा मोठ्याप्रमाणात भार असतो. मुंबई नाशिक महामार्गाचा रस्ता वडपेपासून समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे समृद्धीचा संपूर्ण भार या मार्गावर येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी कोंडी कमी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २०२१ मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा – भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

वडपे ते ठाणे या सुमारे २४ किलोमीटरची मार्गिका मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. येथील अतिरिक्त नव्या मार्गिकांचे काम टप्प्या-टप्प्याने केले जात आहे. परंतु आता मुख्य मार्गिकेच्या निर्माणाचे काम देखील सुरू झाले आहे. सोमवारपासून साकेत पूल ते माजिवडा उड्डाणपूल असे हे काम सुरू झाले आहे. मुख्य मार्गिकाचे काम सुरू झाल्याने ठाण्याहून नाशिक, भिवंडी आणि नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने मुख्य रस्त्यालगत तयार करण्यात आलेल्या नव्या मार्गिकेवरून वाहतूक करत आहेत. मुख्य मार्गिका बंद झाल्याने त्याचा परिणाम या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. मार्गावर कोंडी होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पुढील तीन महिने या वाहतूक कोंडीचा ताप ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे. परंतु या मुख्य मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहन चालकांना आठ पदरी मार्गिका उपलब्ध होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी दिली. असे असले तरी साकेत पूलावर केवळ चार पदरी मार्गिका उपलब्ध आहे. त्यामुळे साकेत पूलाचे काम सुरू झाल्यानंतर चालकांना पुन्हा कोंडीचा ताप सहन करावा लागणार आहे. या संदर्भात कापूरबावडी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्य रस्ता बंद करण्यात आला असला तरी त्या लगतच्या नव्या रस्त्यावरून वाहतूक सोडण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – स्टेज शो करण्याच्या नावाखाली महिलेला डान्सबारच्या कामात ढकलले, पोलिसांच्या मदतीने महिलेची दुबईतून सुखरूप सुटका

या संदर्भात एमएसआरडीसीचे उपअभियंता राम डोंगरे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saket bridge part main road widening work mumbai nashik traffic congestion signal ssb