ठाणे : विदेशात जाऊन देशाची आणि भारतीय नागरिकांची बदनामी करणे, अशीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची कायम भूमिका राहिली असून त्यांनी केलेल्या वक्तव्यातून काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जे धोका देऊ शकतात, ते आरक्षणाच्या बाबतीत केव्हाही धोका देऊ शकतील, अशी टीका करत आरक्षण रद्द करण्याची हिम्मत जो करेल, त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर असून तिथे त्यांनी आरक्षणासंबंधी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे पोटात असते, तेच ओठावर येते. याचप्रमाणे राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे बोलून दाखविले आहे. यानिमित्ताने काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला आहे. काँग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा धोका देऊन पराभूत केले होते. यामुळे जे लोक बाबासाहेबांना धोका देऊ शकतात, ते लोक आरक्षणाबाबतीत केव्हाही धोका देऊ शकतात, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी सांगायचे की, काँग्रेस हे जळके घर आहे आणि त्यांचा अनुभव त्यांना आला होता, असे सांगत त्यांनी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या आरक्षणाच्या पाठीशी महायुती आणि एनडीए सरकार असेल, असे सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार

हेही वाचा – डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून मजुराला लुटले

ज्यांना आरक्षण मिळाले, त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा आज दिसला आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार आणि बाबासाहेबांनी दिलेले आरक्षणही रद्द करणार, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला होता. परंतु निवडणुकीनंतर काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळेच त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच आरक्षण रद्द करण्याची हिम्मत जो करेल, त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राहुल गांधी हे विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. याचा देशभक्त आणि देश प्रेमी जनतेनेही विचार केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताचे नावलौकिक केले आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणत आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्याची संकल्पना मांडली आहे. यामुळे एकीकडे मोदी देशभक्तीच्या गोष्टी करत असताना दुसरीकडे राहुल गांधी देशाचा अपमान करणारे वक्तव्य करत आहेत. यामुळेच संविधानाला मानणारी देशातील जनता सुज्ञ असून ती काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.