ठाणे – रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरती शाळा (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १७० बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला असून त्यापाठोपाठ आता दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील ४५० ते ५०० बालकांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात २० जून रोजी महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागातर्फे जिल्ह्यातील गरजू, निराधार मुलांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. याच अंतर्गत मागील एक वर्षापासून रस्त्यावर राहणारी बालके, आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुले यासर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महिला बाल विकास विभागातर्फे फिरती शाळा ही संकल्पना राबविण्यात आली होती. यामध्ये एक बस द्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासी विभागात शिक्षण देण्यात येत होते. या उपक्रमास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. राज्यात ठाणे जिल्ह्यासह सात जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी येथील १७० बालकांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला होता. याच पद्धतीने प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात जिल्हा महिला आणि बालविकास विभागाला यश आले आहे.

हेही वाचा >>>अतिधोकादायक इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडीत करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावरील बालकांबरोबर महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले सहा ते सात महिने काम करुन बालकांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची आवड वाढविली आहे. या बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा व त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. याचेच यश म्हणून रस्त्यावर राहणारी व शाळेत न जाणारी ४५० ते ५०० बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणार आहेत. या बालकांच्या शाळेचे प्रवेशपत्र महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २१ जून रोजी पार पडणार आहे.