भाईंदर :- शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आपल्याच सरकारविरोधात आयोजित केलेले आंदोलन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर ओढावली. कारण ठरले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात झालेले आगमन. दुसरीकडे भाजपाच्या दुसऱ्या गटाने या आंदोलनाशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंक्षातर्गत वाद देखील समोर आला आहे.

तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने २२ कोटी रुपये खर्च करून शहरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र या रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. पण आपल्याच सरकारला याबाबत जाब कसा विचारायचा म्हणून भाजप पक्ष शांत होता. पंरतु माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी बुधवारी आपल्याच सरकारला जाब विचारण्यासाठी बुधवारी दुपारी आंदोलन पुकारले होते. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तन येथील रामभाऊ प्रबोधनीमध्ये आले. खुद्द फडणवीस शहरात आल्याने भाजपाला हे आंदोलन करणे महागात पडणार असल्याचे लक्षात आले आणि आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा – वसई : नायगावमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले, ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास

आंदोलन रद्द करताना थातूरमातूर कारण देण्यात आले. आंदोलनास आज पोलिसांची कायदेशीर परवानगी प्राप्त झाली नव्हती. तसे शहरात दोन ठिकाणी इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची मदत करण्यासाठी आजचे आंदोलन उद्यावर ढकलण्यात आले आहे, असे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांच्या एण्ट्रीमुळे भाजपाचे फसलेले आंदोलन शहरात चांगलेच रंगले होते.

हेही वाचा – भाईंदरमध्ये तासाभरात दोन ठिकाणी इमारतीचा भाग कोसळण्याची घटना, कोणतीही जीवितहानी नाही

दुसरीकडे भाजपातील मेहताविरोधी गटाने या आंदोलनाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनाबाबत आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे यास समर्थन किंवा विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे भाजपाचे नेते रवी व्यास यांनी सांगितले. यामुळे पक्षातील अंतर्गत वाद देखील समोर आला आहे.