भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात बुधवारी सकाळी दोन ठिकाणी इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत बचावकार्य राबवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मिरा भाईंदर शहरात सतत पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरा रोड येथील आरएनए ब्रॉडवेमधील बिल्डिंग क्रमांक १७ मध्ये पहिला मजल्यावरील हॉलचा सज्जा थेट तळमजल्यावरील घरात कोसळ्याची घटना घडली आहे.यावेळी दोन्ही घरातील व्यक्ती किचन व आतल्या रूममध्ये असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले आहे. सदर इमारत ही वीस वर्षे जुनी असून इतर सदनिकाची व इमारतीची रचनात्मक तपासणी करून घेण्याचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले आहे. हेही वाचा - वसई : नायगावमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले, ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास हेही वाचा - विरारच्या चिखलडोंगरी गावात पुन्हा जात पंचायतीची दहशत, महिलेला जमावाची मारहाण, पोलीस बघ्याच्या भूमिकेत दुसरी घटना ही भाईंदरच्या बीपी रोड परिसरात घडली आहे. यात साधारण सतरा वर्षांपूर्वीच उभारलेल्या दुमजली व्यावसायिक दुकानाचा कडेचा भाग सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यावर कोसळला आहे. यात एका रिक्षाचालकासह अन्य व्यक्ती जखमी झाला आहे. दोघांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इमारत मोकळी करण्याचे काम महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत हाती घेण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.