याच वस्तीत एका सायकल दुकानदाराने पुढे येत शिरोडकर यांना पुष्पहार घातला. ‘आप मनसे को सपोर्ट करते हो क्या.’, असे विचारल्यावर त्या दुकानदाराने छान स्मितहास्य केले. डोळे मिचकावत तो म्हणाला, ‘लास्ट टायम एकनाथ गायकवाड आया था.. उनके गलेंमें भी अपनी तरफसे हार पडा.’!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदान जवळ येत चालले आहे तसे उमेदवारांच्या प्रचारफेऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘तरुण, तडफदार, इत्यादी इत्यादी.’ उमेदवार आदित्य शिरोडकर यांनी वडाळा बीपीटी कॉलनी भागात काढलेल्या प्रचारफेरीकडे पाहताना मात्र कुसुमाग्रजांची ‘राजा आला..’ ही कविता आठवत होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीसाठी आदित्य शिरोडकर या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षाला उमेदवारी दिली. आदित्य शिरोडकर यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारफेऱ्यांचा धडाका लावला आहे. रविवारी विश्वचषकाची अंतिम फेरी असूनही त्यांनी वडाळा भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारफेरी काढली. संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या प्रचारफेरीसाठी महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. वडाळा भागात महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे प्राबल्य असूनही मनसेच्या प्रचारफेरीला चांगला प्रतिसाद होता.
ढोल-ताशाचे पथक, त्यामागे मनसेच्या काही स्थानिक नेत्यांसह स्वत: आदित्य शिरोडकर, त्यांच्यासह कण्र्यावरून घोषणा देणारा एक कार्यकर्ता, त्यांच्यामागे दीडशे-दोनशे कार्यकर्त्यांचा फौजफाटा आणि या सर्वामागे मनसेचे प्रचारचिन्ह असलेले इंजिन, असा सरंजाम वडाळा बीपीटी कॉलनी, नाडकर्णी उद्यान, वडाळा स्मशानभूमी या परिसरात फिरत होता. रविवारी वातावरणात चांगलाच उष्मा असल्याने आदित्य यांच्याबरोबर पाण्याचाही चांगलाच बंदोबस्त होता. आदित्य यांची प्रचाराची पद्धत मात्र ८०-९०च्या दशकातील चित्रपटांमध्ये पुढाऱ्यांचा प्रचार दाखवतात, तशीच होती.
पायीपायी फिरणाऱ्या आदित्य यांनी वडाळा बीपीटी परिसरातील चाळींमध्ये शिरण्याची तसदीही घेतली नाही. ढोल-ताशाच्या आवाजाने वडाळ्याच्या चाळींमधील लोक कुतुहलाने बाहेर येत होते. मनसेचे झेंडे बघून कौतुकाने थांबतही होते. हा उमेदवार आपल्याशी येऊन बोलेल, आपल्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करेल, असे या मतदारांना वाटत होते. मात्र आदित्य प्रत्येक चाळीसमोर जाऊन नमस्कार करून, हात दाखवून आल्या पावली परत फिरत होते. त्यामुळे रहिवाशांना सखेद आश्चर्यही वाटत होते.
गेल्या आठवडय़ात एकनाथ गायकवाड येथे प्रचारफेरीसाठी आले होते. एकनाथ गायकवाड सध्या खासदार आहेत. मात्र त्यांनीही आमच्याशी संवाद साधला. आता मनसेचे उमेदवार आले, लवकरच शिवसेनेचेही येतील. पण यांच्यापैकी आमच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराबद्दलच आम्हाला जास्त आदर वाटणार, अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.
वडाळा बीपीटी कॉलनी, नाडकर्णी उद्यान, या परिसरातून ही प्रचारफेरी अत्यंत गजबजाटाच्या अशा दर्गा रस्त्यावरून निघाली. ही सर्व मुस्लिमबहुल वस्ती! तळहातावर पोट घेऊन मेहेनत करणाऱ्या या लोकांशीही आदित्य यांनी संवाद साधला नाही. ‘मनसेचे तरुण तडफदार उमेदवार आदित्य शिरोडकर आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आपल्याला भेटण्यासाठी आपल्या भागात आले आहेत.. २४ तारखेला त्यांनाच मत द्या. मनसेला मत म्हणजे विकासाला मत.’ अशा घोषणा कण्र्यातून दिल्या जात होत्या, दुकानदार, भाजीवाले, मासेवाल्या, फेरीवाले आपापली कामे करत होते आणि प्रचारफेरी पुढे सरकत होती. या भागात चाळींबरोबरच काही उत्तम इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. चाळीतील लोक कुतुहलाने बाहेर येऊन दखल तरी घेत होते. मात्र इमारतीतील लोकांनी आपापल्या सौधातून डोकावून बघण्याची तसदीही घेतली नाही. एकीकडे ढोल-ताशांचा आवाज येत असताना दुसरीकडे भारताच्या फलंदाजांनी चेंडू सीमापार केल्यानंतर घराघरांतून येणारे जोरदार शिट्टय़ांचे आवाज या प्रचारफेरीचा माहोल चांगलाच उलगडून दाखवत होते.

 

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election campaign