संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याची घोषणा केलीय. तसेच त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. यावर भाजपा संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेत पाठिंबा देणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते नवी दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे यांना मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं. आता संभाजीराजेंना भाजपाचा पाठिंबा द्यायचा की नाही याचा राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर निर्णय होईल. त्यामुळे याबाबत जो योग्य निर्णय असेल तो सांगू.”

“भाजपाचे राज्यसभेत दोन खासदार अगदी स्पष्टपणे निवडून येतात. आमच्याकडे मतं आहेत, आणखी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या संदर्भातील भाजपाचे सर्व निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेऊ,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

२०२४ च्या तयारीसाठी ज्ञानवापीचा मुद्दा असल्याची राऊतांची टीका, फडणवीस म्हणाले….

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. ते म्हणाले, “संजय राऊत रोजच टीका करतात. त्यांनी आम्ही महत्त्व देत नाही. तो महत्त्वाचा माणूस नाही.”

“ज्ञानवापीच्या राजकीय परिणामांचा आम्ही विचार करत नाही. हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेचा विषय राजकारणाच्या पलिकडील असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जात आहेत. ही देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. न्यायालयाने आज कोर्ट कमिशनर नियुक्त केला. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्यावर न्यायालय जो निर्णय देईल तो अत्यंत महत्त्वाचा असेल,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

“हे प्रकरण न्यायालयात असल्याने आपण त्यावर फार वाद करणं योग्य नाही. मात्र, हे खरंच आहे. आपल्या सर्वांना हा इतिहास माहिती आहे की कशाप्रकारे मंदिरांवर आक्रमणं करून औरंगजेबाने ते मंदिर कसं तोडलं होतं,” असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेशच्या आधी न्याय मिळू शकला असता, कारण मध्य प्रदेशने जे केलं ते करा म्हणून आम्ही मागील २ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारला सांगत आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ टाईमपास केला. कमिशन तयार केलं त्याला पैसे दिले नाहीत.”

हेही वाचा : मोठी बातमी! शरद पवार यांचा राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युला सांगत म्हणाले…

“कमिशनने स्वतः सांगितलं की आम्हाला एक पैसा दिला नाही, स्टाफ दिला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशने जो रिपोर्ट ६ महिन्यात तयार केला तो महाराष्ट्राला २ वर्षे तयार करता आला नाही. न्यायालयाने कालही हेच सांगितलं की महाराष्ट्रासह ज्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे त्या राज्यांनी रिपोर्ट तयार करावा आणि ओबीसी आरक्षण द्यावं,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

“महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणं राजद्रोह, तर औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणं राजशिष्टाचार”

“महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणं राजद्रोह आहे, तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणं हा राजशिष्टाचार आहे. त्यांनाच संरक्षण आहे, इतर कोणालाही संरक्षण नाही,” असं म्हणत फडणवीसांनी मविआ सरकारवर हल्ला चढवला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on rajyasabha election and sambhajiraje chhatrapati pbs
First published on: 19-05-2022 at 16:36 IST