केंद्रीय लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना नारायण राणे यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली. आपण ही भेट प्रशासकीय कामासंदर्भात घेतल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण इतर कोणत्याही विषयांवर अमित शाह यांच्यासोबत चर्चा केलेली नसल्याचंही राणे म्हणालेत. यावेळी त्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यादरम्यान होणाऱ्या भेटीबद्दलही भाष्य केलंय.

भेटीसंदर्भातील तपशील देताना राणेंनी, “माझ्या खात्यासंबंधी काही विषय होते त्याबद्दल चर्चा केली. ती काही सांगण्यासारखी बाब नाहीय. प्रशासनासंदर्भातील चर्चा होती. त्यानंतर इतर कोणत्याही विषयावर चर्चा न करता मी तिथून निघालो,” असं राणे म्हणाले आहेत. जेव्हा जेव्हा अमित शाहांना भेटता तेव्हा चर्चेला उधाण येतं, असं म्हणत पत्राकारांने पश्न विचारण्यास सुरुवात केली असता नारायण राणेंनी हसून, “त्याला कारण तुम्ही लोकच आहात,” असं म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असून ते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राणेंनी या भेटीबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. रविवारी उद्धव ठाकरे अमित शाह यांना का भेटणार आहेत माहित नाही. मुख्यमंत्री या नात्याने गृहमंत्र्यांना भेटत असतील, असं राणे म्हणाले आहेत. राज्यामध्ये मध्यंतरी तुमच्यावर झालेल्या कारवाईबद्दल केंद्राला काही महिती दिली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, “ज्या प्रकरणावर माझ्यावर कारावाई केली त्याला मी चांगलं उत्तर दिलंय. महाराष्ट्राच्या जनतेनंही उत्तर दिलंय,” असं राणे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर जात असून नक्षलीप्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. या बैठकीनंतर ठाकरे हे शहांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी घेतलेली अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.  जनआशीर्वाद यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानानंतर राणेंना अटक करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारकडून झालेली ही कारवाई व वागणुकीची माहिती राणेंनी शहांना दिली. जनआशीर्वाद यात्रेवरून परत आल्यानंतर लगेचच राणेंनी शहांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane meets amit shah scsg
First published on: 23-09-2021 at 12:24 IST