PM Narendra Modi followers on X : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीत आणखी वाढ झाली आहे. आज रविवारी (१४ जुलै) त्यांच्या एक्सवरील फॉलोअर्सच्या संख्येने १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटींची संख्या पार केली आहे. मागच्या तीन वर्षांत त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत जवळपास तीन कोटींनी वाढ झाल्याचे सांगितले जाते. सरकारी प्रतिनिधी असलेल्यांपैकी जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. स्वतः मोदी यांनी एक्सवर पोस्ट टाकून आपल्या फॉलोअर्सचे आभार मानत, ही बातमी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागितक नेत्यांबाबत बोलायचे झाल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ३८.१ दशलक्ष, तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचे २१.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. भारतात पुढाऱ्यांची तुलना करायची झाल्यास पंतप्रधान मोदी हे फॉलोअर्सच्या संख्येत इतर नेत्यांपेक्षा खूप पुढे असल्याचे दिसते. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचे २७.५ दशलक्ष तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे २६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

हे ही वाचा >> नितीन गडकरी यांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान,”चांगले दिवस आले की आपण जुन्या काळातला संघर्ष…”

पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “एक्सवर १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा पार केला. या नव्या माध्यमावर आल्यानंतर चर्चा, वादविवाद, लोकांच्या शुभेच्छा, विधायक टीका आणि इतर संदेश वाचून आनंद वाटला. भविष्यातही या माध्यमावर आणखी आनंद मिळेल, अशी अपेक्षा करतो.”

नरेंद्र मोदी यांची अनंत राधिकाच्या लग्नात हजेरी (फोटो – @bhansaligautam1/X)

सर्वाधिक फॉलोअर्स असलेले पाच जागतिक नेते कोण?

पंतप्रधान मोदींनी १०० दशलक्ष फॉलोअर्सची संख्या पार केल्यानंतर आता ते जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमाकांचे नेते ठरले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सर्वाधिक १३१.७ दशलक्ष इतके फॉलोअर्स आहेत. मात्र ते सध्या सरकारी पदावर नाहीत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमाकांवर डोनाल्ड ट्रम्प ८७.४ दशलक्ष फॉलोअर्स, चौथ्या क्रमाकांवर जो बायडेन ३८.१ दशलक्ष, तर पाचव्या क्रमाकांवर असलेल्या रेसेप तय्यिप एर्दोगन यांचे २१.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

हे ही वाचा >> “देवाची कृपा म्हणून…”, जीवघेणा हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

सेलिब्रिटींपेक्षाही पंतप्रधान मोदी पुढे

जागतिक पातळीवरील खेळाडू आणि सेलिब्रिटींपेक्षाही आता मोदींची सोशल मीडियावरील प्रसिद्धी टीपेला पोहोचली आहे. एक्सवर असलेल्या विराट कोहली (६४.१ दशलक्ष), ब्राझिलचा फूटबॉलपटू नेयमार ज्यु. (६३.६ दशलक्ष) एवढे फॉलोअर्स आहेत. तर गायिका टेलर स्विफ्ट (९५.३ दशलक्ष), लेडी गागा (८३.१ दशलक्ष) आणि किम कार्दशियन (७५.२ दशलक्ष) फॉलोअर्स आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi has 100 million followers on x site who are top 5 leaders on social platform kvg