कोल्हापूरमध्ये भाजपाला मोठा धक्का! समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश

समरजितसिंह घाटगे यांनी आज कागलमध्ये शरद पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला. कागलमधील गैबा चौकात त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

samarjeet singh ghatge
समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश ( फोटो – संग्रहित )

भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे भाजपा सोडचिट्ठी देणार असून ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही दिवसांपूर्वी कागलमध्ये झालेल्या सभेत बोलताना त्यांनी याचे संकेतही दिले होते. दरम्यान, आज त्यांनी अधिकृतपणे भाजपा सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

गैबी चौकातील सभेत पार पडला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम

समरजितसिंह घाटगे यांनी आज कागलमध्ये शरद पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला. कागलमधील गैबी चौकातील सभेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. याशिवाय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित असल्याचेही बघायला मिळालं.

हेही वाचा – कारण राजकारण : कागलची बदलती समीकरणे कुणाच्या पथ्यावर?

शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

“शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचं राजकारण करायचं आहे”

यावेळी बोलताना, “गैबी चौकात सभा घ्यावी असं स्वत: शरद पवार यांनी सुचवलं होतं. काही जणांना वाटत होत, की गैबी चौकातच फक्त त्यांचीच सभा होऊ शकते, पण हा वस्तादांचाच गैबी चौक आहे. स्वर्गीय मंडलिक आणि घाटगे यांनी कागलचा पुरोगामी विचार पुढे नेला आहे. तेच काम आता मी करणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचं राजकारण करायचं आहे. त्यांच्या नेतृत्वातच आता या कागलच्या भूमीत परिवर्तन घडवायचं आहे ” , अशी प्रतिक्रिया समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

हेही वाचा – कोल्हापूरच्या ‘समरा’त पवारांची ‘जीत’, घाटगेंच्या प्रवेशामुळे मुश्रीफांसमोर आव्हान

“प्रत्येक घराघरात तुतारी पोहोचवायची आहे”

पुढे बोलताना, “मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आज कुणीही आनंद साजरा करु नका. पुढच्या दोन महिन्यात आपल्याला खूपकाही काम करायचं आहे. कागलमध्ये प्रत्येक घराघरात तुतारी पोहोचवायची आहे, त्यासाठी काम करा”, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur samarjeet singh ghatge join ncp sharad pawar faction vidhansabha election 2024 spb

First published on: 03-09-2024 at 20:34 IST
Show comments