Bihar Projects in Budget 2024 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, शिक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सीतारमण यांनी बिहारमधील गया येथील विष्णूपद मंदिर आणि बोधगया येथील महाबोधी मंदिरासाठी कॉरिडॉर प्रकल्प बांधले जातील, अशी घोषणा केली. जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, अयोध्येमधील राम मंदिर, उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात असेच कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत,” असे त्यांनी भाषणात सांगितले. विष्णूपद आणि महाबोधी मंदिर एकमेकांपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहेत. या मंदिरांचे वैशिष्ट्य काय? पौराणिक कथा काय? या प्रदेशात त्यांचे महत्त्व काय? याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गया येथील विष्णूपद मंदिर

गया येथील विष्णूपद मंदिर हे एक हिंदू मंदिर असून भगवान विष्णूला समर्पित आहे. राज्याच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटमध्ये दिलेल्या दंतकथेनुसार, गयासूर नावाच्या राक्षसाने/असुराने देवांना एका शक्तीची मागणी केली. त्याला जो व्यक्ती बघेल, त्याला मोक्ष मिळेल आणि तो व्यक्ती पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होईल, अशी ही मागणी होती. जेव्हा त्याला ही शक्ती मिळाली, तेव्हा त्याने त्याचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. अखेर, त्याला थांबवण्यासाठी देवांना भगवान विष्णूची मदत घ्यावी लागली. भगवान विष्णूंनी राक्षसाला पाताळ लोकात पाठविण्यासाठी त्यांचा उजवा पाय राक्षसाच्या डोक्यावर ठेवला. याच पायाचा ठसा एक शिळेवर उमटला आहे, जो मंदिरात दिसतो. हा ठसा ४० सेंटीमीटर लांब आहे.

गया येथील विष्णूपद मंदिर हे एक हिंदू मंदिर असून भगवान विष्णूला समर्पित आहे.(छायाचित्र-फेसबुक/विष्णूपद मंदिर)

हेही वाचा : Union Budget 2024: रोजगार, कौशल्यविकासाच्या तीन गेमचेंजर योजनांची घोषणा; कोणाला होणार फायदा?

भक्त मोठ्या संख्येने पितृ पक्षाच्या वेळी या मंदिराला भेट देतात. पितरांचे पिंडदान करून भक्तगण विष्णूपदाचे दर्शन करतात. या पायांच्या ठश्यांची पूजा केली जाते; अर्थात त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म अशी चिन्हे रक्तचंदनाच्या सहाय्याने रेखाटली जातात. स्थापत्यशास्त्रानुसार, मंदिर सुमारे १०० फूट उंच आहे आणि त्यात ४४ खांब आहेत. हे मंदिर फाल्गु नदीच्या काठावर आहे. अहमदनगरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आदेशानुसार १७८७ मध्ये हे मंदिर बांधले गेले.

बोधगया येथील महाबोधी मंदिर

बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे मंदिर महाबोधी वृक्षाच्या पूर्वेला आहे; जिथे गौतम बुद्धांना निर्वाण मिळाले असे मानले जाते. मंदिराचा आकार अनोखा आहे आणि मंदिराची उंची १७० फूट आहे. युनेस्कोच्या सूचीमध्ये असे म्हटले आहे की, “महाबोधी मंदिर परिसर हे सम्राट अशोकाने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात बांधलेले पहिले मंदिर आहे. सध्याचे मंदिर पाचव्या-सहाव्या शतकातील आहे. गुप्त कालखंडाच्या उत्तरार्धात पूर्णपणे विटांनी बांधलेले हे मंदिर सर्वात प्राचीन बौद्ध मंदिरांपैकी एक आहे, जे अजूनही उभे आहे.

महाबोधी मंदिरात भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती स्थापित आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

त्यात असेही नमूद करण्यात आले आहे की, “या स्थळाला यात्रेकरू/पर्यटक (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय) मोठ्या संख्येने भेट देत असल्याने, इथे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधा विकसित करण्याची गरज आहे. शहरासह संपूर्ण क्षेत्राच्या संभाव्य घडामोडींचा या ठिकाणाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर होणाऱ्या प्रभावाचे सतत निरीक्षण करणे हे एक मुख्य आव्हान आहे. महाबोधी मंदिरात भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती स्थापित आहे. हे स्थान बौद्ध धर्मियांसाठी सर्वात पवित्र मानले जाते.

हेही वाचा : बिअर बाथिंग म्हणजे काय? त्यामुळे आरोग्याला खरंच फायदे होतात का?

बिहार पर्यटनाचे महत्त्व

या वर्षीच्या अर्थसंकल्पात बिहारमधील पर्यटन आणि पायाभूत सुविधांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय राजकारणात बिहार राज्याला महत्त्व आहे. विशेषत: २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, बिहार राज्याचे राजकारणातील महत्त्व आणखीनच वाढले आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने राज्यात १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, एनडीएचा एक भाग असणारा जेडी(यू)) पक्ष केंद्रात सत्ताधारी पक्षाला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भाजपा २४० जागांसह एनडीए आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. परंतु, २७२ च्या बहुमतासाठी भाजपाकडील संख्याबळ कमी आहे. त्यामुळे भाजपा जेडी(यू) आणि आंध्र प्रदेशातील तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) सारख्या छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून आहे. टीडीपीने लोकसभेत १६ जागा जिंकल्या आहेत. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत; ज्यात राज्याची नवीन राजधानी अमरावतीसाठी १५ हजार कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget announcements for vishnupad and mahabodhi temple gaya rac