राज्यातील वाढते तापमान पाहता दुपारच्या वेळेत बाहेर पडणे, उन्हात फिरणे हे त्रासदायक ठरत आहे. अशा परिस्थितीत सातत्याने पाण्याचे सेवन न केल्यास नागरिकांना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता वाढत आहे. अनेकांना उष्माघात, शरीराचे निर्जलीकरण, सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बॉसिसचा त्रास होत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेत सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु उष्माघात म्हणजे काय, काय काळजी घ्यावी हे समजून घेणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उष्माघात म्हणजे काय?

खूप वेळ, सतत कडक उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो. त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात किंवा सनस्ट्रोक. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाची शारीरिक स्थिती निर्माण होते. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशात वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताचे प्रकार वाढत आहेत. महाराष्ट्रात, विशेषत: मराठवाडा व नागपूर या भागात दरवर्षी उष्माघातामुळे नागरिकांच्या मृत्यू होण्याच्या घटना घडतात. देशामध्ये राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटांच्या झळांचा सामना नागरिकाांना सोसाव्या लागतात.

हेही वाचा : पाकिस्तानला चीनकडून आधुनिक पाणबुडी.. भारतासाठी कोणते आव्हान?

उष्णतेची लाट म्हणजे काय?

भौगोलिक स्थितीनुसार उष्णतेच्या लाटेचे निकष वेगवेगळे असतात. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवले गेले किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा ४.५ अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचे मानले जाते. कमाल तापमानातील वाढ ६.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट म्हटले जाते. जून २०२१ मध्ये कॅनडात विक्रमी तापमान वाढीमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. उष्णतेची लाट आल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाला होता.

राज्यात उष्माघाताचे रुग्ण किती?

उन्हामध्ये तापमान नियंत्रित ठेवणारी शरीरामध्ये एक यंत्रणा असते. या यंत्रणेचे कार्य विस्कळीत झाल्यास नागरिकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्यासाठी सातत्याने पाण्याचे सेवन कमी करणे आवश्यक असते. राज्यामध्ये मागील काही वर्षांपासून उष्णतेचा तडाखा वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये २०२२ उष्माघाताचे ७६७ रुग्ण आढळले तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर २०२३ मध्ये ४२१ रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा १ मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण सापडले आहेत. मात्र अजून मे महिना आणि ऑक्टोबर हा कालावधी शिल्लक असल्याने वर्षातील एकूण रुग्णसंख्येची नोंद अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या हातातून मुंबई कशी निसटली? लोकसभा निवडणुकीत किती संधी?

रक्त गोठण्याचा धोका?

वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत असून उष्माघातामुळे सातत्याने शरीराचे निर्जलीकरण होऊन मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून तीव्र झटका येण्याच्या शक्यता असते. यामध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. सतत उन्हात फिरत असल्यास शरीरातून पाणी आणि क्षार बाहेर फेकून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र या कालावधीत पाणी, लिंबू पाणी, विविध पेयांचे सेवन न केल्यास व्यक्तीच्या शरीराचे निर्जलीकरण होऊन त्याला उष्माघाताचा त्रास होतो. निर्जलीकरणाची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्त हळूहळू गरम होऊन घट्ट होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून व्यक्तीला तीव्र झटका येण्याची शक्यता असते. या झटक्याला वैद्यकीय भाषेत ‘सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बॉसिस’ असे म्हणतात. हा झटका तीव्र असल्यास व्यक्तीचा मृत्यूही ओढावू शकतो. उन्हात काम करणारे मजूर, कामगार, दुपारी फिरतीचे काम असणारे कर्मचारी यांना ‘सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रोम्बॉसिस’चा धोका अधिकअसतो, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव संचालक डॉ. भरत जगियासी यांनी दिली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is heatwave and how can heatstroke leads to death print exp css
First published on: 30-04-2024 at 08:25 IST